पूर्वी होती माझ्या कवितांना कागद पुरवलेल्या तमाम लोखंडी हातांना


goya painting of indian mazdoor
साहित्यिक उपजतो कागदावर. आर्थिक मानसिक भावनिक शारीरिक कागदाचे अनेक पोत. माशाला पाण्यावर प्रेम व्हावं तसं कोणाला कागदावर प्रेम होतं आणि तो कागदावर लिहितो कागदाच्या वंचना. पण तो कागद कोणी वाचलाच नाही तर? मग त्या वंचनांचं काय?


शब्दांच काय ते विचारातून येतात. नाहीच आले तर उधारीचेही असतात. नसल्यास चोरताही येतात. विचार आपले आपोआप घडत जातात. विचारांच्या पायाभरणीसाठी नैतिक बळकटीची वैचारीक डबर वैगेरे टाकता येते. दर्जेदार साहित्यिक खते घालता येतात. कल्पनेचं बीज, त्याची गुणवत्ता आणि नवनिर्मितीसाठीची धडपड ही मानवी स्वभावात असतेच. मग उरलं काय? कसदार जमीन. कागद. हा कागद कोणीतरी पुरवावा लागतो येनकेनप्रकारेण. तरी अंतीमत: बीज बहरलं, फळे लागली की जमिनीशी प्रतारणा करणारे, कागद पुरवलेल्यांशी बेइमानी करणारे कमी आहेत काय?


खाली पडून वर चढण्यात मजा नाही

मी कुठं म्हणतोय तुला खाली पड
आणि इतका भटकतोयस गेली वर्ष
आणि हताश आहेस कोणी छापेना
आणि भलाथोरला कलाकार आहेस
आणि

आणि

आणि मित्र आहेस म्हणून भल्यासाठी म्हणतोय
आणि तुला फक्त अर्पणपत्रिका लिहायचीये साहेबांच्या नावाची
आणि बाकी तू तुझा स्वतंत्र आहेसच हवं ते लिहायला
त्याचं काये अनुदान वैगेरे बक्कळ येतं रे वरून
पण कडक लिहिणारेच उरलेले नाहीत
आणि साहेबांनाही गरज असतेच रे तुमच्यासारख्या कलाकारांची
आणि राजकारण-साहित्य हाताआतहात घालून चालतात

चालतात नंतर प्रश्नचिन्ह पाहिजे उद्गारवाचक नको
आणि खाली पडून वर चढण्यात मजा नाही

आता बघ बाबा तुझं तू गाढवापुढे वाचली गीता

आणि खाली पडून वर चढलेला निघून गेला
आणि त्याचे शब्द वाऱ्यावर विरून न जाता राहिले भिरभिरत अवतीभवती
घरी येऊन अंतिम जुळवणीत कवीने गाळल्या अलायक साहेबांवरच्या सत्याऐंशी बंडखोर कविता
आणि लिहिली नवी अर्पणपत्रिका त्याच साहेबांच्या नावे





{fullwidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال