
गेल्या दोन दशकांपूर्वी पावलोपावली दिसणारी सायकल पंक्चरची दुकाने, स्टोव्ह-घडयाळ-चपला-रेडियो दुरुस्तीची दुकाने, सीडी-डीव्हीडीची दुकाने, इतकंच काय तर काळाशी सुसंगत असणारी ‘सायबर कॅफे’ची दुकानेही लुप्त झालीत. हा काळाचा बदल म्हणून मान्य; पण यात आणखी एक बाब लुप्त झालीये – वाचनालये. वरील आणि इतर सर्व बाबींचं नामशेष होणं पचवता आलं तरीही वाचनालये कमी होणं ही गोष्ट आपल्याला मानवणारी नाही. मात्र तूर्तास 'वाचन घटले, वाचाल तर वाचाल, वाचन संपलेल्या समाजाची स्थिती' असले विषय टाळून आठवणीतील वाचनालयांवर आणि जडणघडणीवर हा लेख . . .
वाचनालयाची आणि माझी ओळख वडीलांमुळे झाली. त्यावेळी मी चार-पाच वर्षांचा असेन. वडील मला आणि बहिणीला घेऊन वाचनालयात जायचे. तिथे (जाहिरातीसह) संपूर्ण पेपर वाचणार्या वडिलांच्या धीरोदात्त संयमापुढे माझा संयम तुटून जायचा. मी घरी चला म्हणून रडायचो, कधी स्वतःच घरी निघाल्याचं नाटक करायचो; पण सगळे पेपर वाचल्याशिवाय वडील वाचनालय सोडायचे नाहीत आणि मी पळून रस्त्यावर कुठेही जाईन ह्या भितीने ताई माझी पाठ सोडायची नाही. नंतर मग मला राजी करण्यासाठी आम्ही पीडब्ल्यूडीच्या मैदानावर क्रिकेट बघायला जायचो. आयुष्यातले असे कितीतरी रविवार मला आठवत आहेत.
मोठा झालो तसं मग वडिलांमुळेच वाचनाची आवड लागली. रद्दीतून आणलेली पुस्तके हा वेगळा विषय आहे मात्र, वडिलांसोबत वाचनालयात गेलो की वडील मला वाचण्यासाठी लेख शोधून द्यायचे मग मी ते लेख वाचून काढायचो. आयुष्यातील असेही कितीतरी रविवार मला आठवत आहेत. माझा वेळ वाचन कमी आणि टंगळमंगळ जास्त असा निघत असे. वाचनालयाच्या शेडवर चढ, आजूबाजूच्या झाडांवर चढ, पोलला भिंगरी खेळ असले उद्योग केलेले आठवतात.
शैक्षणिक वर्षांनी माझे झीट काढायला चालू केली तशी माझी वाचण्याची गोडी कमी झाली. घरी पेपर येऊ लागला आणि पुस्तके आणू लागलो त्यामुळे वाचनालयात आणि माझ्यात दुरावा निर्माण झाला. अकरावी-बारावीत मात्र पुन्हा ‘जुळून येती रेशीमगाठी’चं नवीन पर्व सुरू झालं. बाराच्या आसपास कॉलेज सुटलं की आधी वाचनालय नंतर मग घर. मनासारखा पेपर मिळाला नाही तर दुसऱ्या वाचनालयात जायचो; पण वाचन करून मन भरत नाही व भूक लागून पोट तुटत नाही तोपर्यंत घर गाठायचो नाही! वाचनालयातील वृत्तपत्रातील सर्व कोडी सोडवायचा नाद मला लागला तो याच काळात. शब्दकोड्यांत तर सामान्य पातळी मी केव्हाच मागे सारली. याच शब्दकोड्यांनी माझी मराठी समृद्ध केली. विनोदी आणि मार्मिक लेखांनी चौकटीबाहेरचा विचार करायला शिकवलं. अग्रलेखांनी ‘मोजक्या शब्दात वाचकांच्या मेंदूशी खेळता आलं पाहिजे’ हे शिकवलं. वाचनालयाचं माझ्या जीवनातील स्थान अविस्मरणीय आहे.
दर रविवारी वाचनालयात – क्लास सुटल्यानंतर – वर्तमानपत्र पडण्याआधी मी हजर असायचो. एकटाच तरूण! शब्दकोडं सोडवता सोडवता मग वयस्कर माणसांचा जथ्था यायचा. मला शब्दकोड्यातील जे शब्द आले नाहीत ते शब्द एक म्हातारा इसम सांगायचा. त्याच्या आंधळेपणामुळे तो माझ्या लक्षात राहीलाय, बहुदा डोळ्यांची शस्त्रक्रिया झालेली असावी. वाचनाचं नाटक करताना त्या मंडळींच्या गप्पा ऐकत बसायचो, मजा घ्यायचो.
सगळेच वयस्कर चांगले असतील याचा नेम नाही. काहीजण पुरवण्या मांडीखाली दाबून ठेवायचे, काहीजण तर घरी घेऊन जायचे! एका म्हाताऱ्याने मला छळलं होतं. कॉलेजवरून आल्यावर दोन्ही वाचनालयातील ‘तीच’ कोडी सोडवलेली असायची. दोनदा तीच शब्दकोडी तो इसम सोडवायचा (रिकामटेकडा असावा)! त्याच्या थरथरत्या अक्षरावरून मी त्याला ओळखलं आणि एकाच वाचनालयातील कोडी सोडवायला सांगितलं. मग मी स्वतंत्र झालो, असो.
मोबाईल विश्वाचा जबर फटका वाचनालयांना बसला. वाचनाबद्दल असणारी उत्सुकता(?) आणखी शिगेला पोहोचली. एरवी दिसणारे स्पर्धापरीक्षेचे तरूणही हल्ली वाचनालयात भेटत नाहीत. खरंतर वाचनालयेच मुळात कमी झाली आहेत. जी राहिलीयेत त्यात वर्तमानपत्रे वेळेवर पडतीलच (त्यातही किती पडतील) याची शाश्वती नाही. वाचनालय आता फक्त वयस्कर व्यक्तींच्या भेटीचा अड्डा आणि बेवड्यांसाठी शयनकक्ष बनून गेलंय.
शहरातील वाचनालयांचं असणारं अनन्यसाधारण महत्व समाजाला कळायला अजून काही दशके जावी लागतील असं सद्यपरिस्थितीवरून दिसतयं. समाजात वाचनाबद्दलची असणारी ही अरसिकता मनाला जर्जर करून टाकते – निदान माझ्यातरी. मात्र, या (वाईट) गोष्टीचे (वाईट) परिणाम दूरगामी आहेत. हल्ली वाचनालयांचा वापर फक्त निवडणुकांमध्ये केला जातो. पंचवार्षिक योजनेत नवीन वाचनालय बांधायचं, नवीन असताना उद्घाटनाचे फोटो काढून झाले की मग पुन्हा पाच वर्षात ना त्या वाचनालयात नवीन पेपर पडतात, ना माणसे फिरकतात.
{fullwidth}
सत्य परिस्थिती.. किंबहुना अनेक वाचनालयातील वैविध्य संपून आता ते फक्त स्पर्धा परीक्षा अभ्यासकांचे अड्डे झाले आहेत..
उत्तर द्याहटवा