
हेही हवं तेही हवं. नेहमी स्वार्थ किंवा लोभ आडवे येऊन ही मानसिकता घडवतात असं नाही. खेळण्याच्या खोलीतील बाळाला, मित्रांच्या घोळक्यातील कुमाराला, स्वप्न-जबाबदारीच्या द्विधेतील तरुणाला, स्थळ निवडीतील तरुणीला किंवा मुलांच्या निवडीतील विभक्त आई-बापाला हेही हवं तेही हवं. यात स्वार्थ-लोभ वगळता ज्या भावना आहेत अगदी त्याच संमिश्र भावनांतून मला त्या दोघीही हव्याशा वाटतात . . .
तू आधी आलीस आयुष्यात माझ्या. पण मी सुरुवातीला बोललो तिच्याशी. तुझ्या नखऱ्यांआधी मी मनवलंय तिच्या लटक्या रागाला. नंतर असंही लक्षात आलं ती तुझ्यापेक्षा लाघवी आहे तुझ्याहून जास्त भिनते; पण म्हणून मी तुझ्या डोळ्यांत – अधूनमधून पाहतो ती – करुणेची झालर विसरू शकत नाही. सांगणं असं – तू तुझ्यासारखी आहेस, ती तिच्यासारखी आणि मला तुम्ही दोघी हव्या आहात! मग माझ्यात तुमची स्पर्धा लागते. माझ्यासोबत कोणी चालत रहायचं यासाठी . . .
स्पर्धाय. तुम्हा दोघींत. कधी ती असते कधी तू असतेस मनाजवळ माझ्या.
तुझ्या चुकांवर कधी ती पांघरून घालते कधी सावरून तिला तू देतेस नवे आयाम.
तू बोल बोल बोलतेस तेव्हा ती अबोल अन् तू असतेस मुकी मुकी तेव्हा भंडावून पुरी करते ती तुझी कमतरता.
तुझ्या शांत खोल डोळ्यांत मी उतरतो तेव्हा ती होते दिसेनाशी अन् तू सरकतेस दूर दूर क्षितिजावर तेव्हा बोटांचा वेढा तिच्या पडतो माझ्या बोटांभोवती.
तू स्वभावाला सोडून कधीतरी वागतेस – किंवा म्हणता येईल अचानक मुळ स्वभावात येतेस – आणि मी रूतत जातो. तिच्या बाबतीतही काहीसं असंच.
कधी तू मृदु कधी ती कणखर. ती तुझ्यात आहे कि तू तिच्यात सामावलेलीस आकळत नाही मी नेमकं कोणात शोधतोय कोणाला.
खरं तर मी तुम्हा दोघींना एकमेकांत पाहतो. तुम्हांत काही दुवेही आहेत. तू उन्हाळ्यातील वळीव असशील तर ती धुक्यातली ऊब.
पाहू जाता तिच्या-तुझ्यात आहे साम्यही. तू तुझ्यात कोंडलेत ऋतू तसं तिनंही मला अजून राखलंय तिच्या परीघाबाहेर. आणि कधी ना कधी आज ना उद्या पुढे मागे एकमेकींचा डोळा चुकवून – रागावून किंवा कातावून – दोघी जाणार आहात परतीचे दोर कापून दूर माझ्या. सुरुवातीला तू जाऊ नयेस आणि गेलीस तर मला समजावून जाव्यास चार शहाणपणाच्या गोष्टी. असं मलाही उगाच वाटत राहतं.
स्पर्धाय. तुम्हा दोघींत. तू आणि तुझी प्रतिमा माझ्या मनातली. कधी ती कधी तू जास्त मनाजवळ माझ्या. आजचा दिवस तुझा आहे उद्या स्पर्धा तिची असेल मात्र . . . तुम्ही दोघी . . . आहात तर माझ्याच . . .
{fullwidth}