
एक लहानगी होती, काही मिळालं नाही की जमिनीवर पडल्याचा जोरदार अभिनय करायची; पण डोकं मात्र हळुवारपणे खाली टेकवायची! एकेकाच्या अशा खुबी असतात. कोण चावेल, कोण स्वतःचे केस उपटील, कोणी धाय मोकलून रडेल, कोणी अन्न पाणी त्यागेल, कोणी नुसताच शांत मौनात जाऊन बसेल तर कोणी इतर वस्तूंचं नुकसान करेल. प्रत्येक लहानग्याकडे आई-बापाला ‘नमवण्याची’ शक्कल असतेच. त्यांना कोणीही न शिकवतात ते असे का वागतात याचा मागोवा . . .
भाषेचं सौंदर्य आणि तीचं समृद्ध असणं हे भाषेत असणाऱ्या म्हणी, उक्ती, वाक्प्रचार यांच्यावरून ठरत असतं. एका पिढीकडून, मौखिक स्वरूपात, दुसऱ्या पिढीकडे वाहणारं हे मौलिक ज्ञान मराठी भाषेकडे खूप आहे. मराठी माझी मातृभाषा असल्याने मी हे अजिबातच म्हणत नाही; याउलट इतर भाषांच्या अभ्यासातून मी म्हणतोय – ‘मराठी इतकी समृद्ध भाषा सापडणे अवघड आहे.’ आणि भविष्यात जेव्हा मी आणखी भाषांचा अभ्यास करेन त्यावेळी देखील मराठी जिंकणार याची मला खात्री आहे.
बऱ्याच म्हणी, वाक्प्रचार एकेका मानवी प्रवृत्तीला बंदिस्त करत असतात. ‘मानवी स्वभाविक पैलू बरोबर पकडून त्याला पर्याप्त शब्दात मांडणे म्हणजेच म्हणींचा अविष्कार’ असं म्हणल्यास वावगं ठरू नये. मराठीतील कित्येक वाक्प्रचार आपण सर्वांनीच खूप वेळा ऐकले आहेत, त्यांचा वापरदेखील केलेला आहे. अशाच एका दैनंदिन वापरात असणाऱ्या एका वाक्प्रचारात मला आणखी एक मानवी वृत्ती सापडली. खरंतर याला वाक्प्रचार म्हणण्यापेक्षा उक्ती म्हणल्यास जास्त योग्य ठरेल. अशा या उक्तीचा उहापोह करावा यासाठी शब्दरचना केलीये.
‘पोती ओळखणे’ ही उक्ती ऐकली नाही किंवा वापरली नाही असा महाभाग मराठी भाषेला अजून मिळायचाय! पोती ओळखणे या प्रत्येकी दोन आणि चार अक्षरांनी बनलेल्या अवघ्या दोन शब्दांत संपूर्ण एक मानवी प्रवृत्ती दडलेली आहे. फक्त या दोनच शब्दांत मेंदूला विचारांत गुरफटण्याचं अमाप सामर्थ्य लपलेलं आहे.
‘पोती ओळखणे’ ही प्रवृत्ती संपूर्णतः मानवी नात्यावर भाष्य करते. सोप्या भाषेत याला समानार्थी वाक्प्रचार सापडतात जसे की ‘नस पकडणे’ किंवा ‘वर्मावर/मर्मावर बोट ठेवणे’ इत्यादी. नात्यातील व्यक्तीची भावनिक गळचेपी करून त्या व्यक्तीवर वर्चस्व करण्याची जी प्रवृत्ती आपल्यात आहे त्या प्रवृत्तीचं प्रदर्शन झालं की म्हणायचं ‘आपण त्या व्यक्तीची पोती ओळखली!’
जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते त्या व्यक्तीच्या सवयींचं निरीक्षण करून त्या व्यक्तीच्या भावनिक कमतरता जाणून घ्यायच्या आणि – त्यांचा (गैर)वापर करून – त्या व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळवायचा, त्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध का होईना पण होकार मिळवायचा‘च’. ही कला म्हणजे पोती ओळखणे. ही कला आवर्जून शिकावी लागत नाही. निसर्गतः म्हणजे आपोआप आपण नात्यातील इतर व्यक्तींवर नकळतपणे या कलेचा कमी-जास्त प्रमाणात वापर करत असतो.
पोती ओळखण्याचा प्रकार लहान बाळांमध्ये खूप आढळतो. एकतर ‘त्यांना समजावून फायदा नसतो’ आणि ‘स्वतः समजण्याची त्यांच्या मेंदूची क्षमता नसते’ परिणामी ते पालकांची पोती ओळखतात (आणि मार खातात)! आता ‘मी लहानपणी पालकांची पोती ओळखली नाहीत (आणि मार खाल्ला नाही)’ असे जर कोणी म्हणाला तर त्याला राजकारणी बनवलं पाहिजे. कारण, राजकारणात थापाड्यांची भरती कायम चालू असते!
प्रेमात पण आपण हेच करत राहतो. आता जर आपण ‘पोती ओळखून स्वार्थ साधल्याचे’ प्रसंग आठवले तर चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं; पण हसण्याची ती गोष्ट नाहीये. कारण, जेव्हा आपण हसतो तेव्हा इतर कोणीतरी रडत असतो.
एकतर ‘तिचं’ प्रेम जास्त असतं किंवा ‘त्याचं.’ ज्याचं प्रेम जास्त त्याची परवड जास्त! आधीच्या काळात ‘तो’ ‘तिची’ पोती ओळखून असायचा. आता मात्र मुकाबला बरोबरीचा झालाय! हल्ली ‘ती’ पण ‘त्याची’ पोती ओळखून ‘त्याला’ फरफटत न्यायला शिकलीये, असो.
एकूणच पोती ओळखणे म्हणजे प्रेमाचा गैरफायदा घेणे मात्र चांगल्या गोष्टींसाठी गैरफायदा घेतला तर तो गैर राहत नाही. अशा वेळी पोती ओळखणे वरदान परंतु, वाईट गोष्टींसाठी – भावनिक, शारीरिक, मानसिक आर्थिक गरजांसाठी, यांच्या पिळवणूकीसाठी – पोती ओळखण्याचा उपयोग करणं हे कितपत योग्य आहे हे ज्याचं-त्यानं ठरवायचं. अशावेळी पोती ओळखणे शाप.
खरंतर ‘पोती ओळखणे’ ही उक्ती ‘पोथी ओळखणे’ अशी असावी. काळ उलटला तसा तिचा अपभ्रंश ‘पोती ओळखणे’ असा झाला असावा. माझ्या या तर्कात किती सत्यता आहे? कोणास ठाऊक.
{fullwidth}