माझे निंदक


distorted male face heavy toned painting
मी एक माणसासारखा माणूस असण्याआधी


तुकारामांकडून ‘कोणी निंदा कोणी वंदा | आह्मां स्वहिताचा धंदा ||’ ऐकण्याआधीच हे शिकलो ते माझ्या निंदकांच्या कृपेमुळे. जर माझे निंदक नसते तर – ओढूनताणून, जाणूनबुजून केलेली निंदा वाट्यास आल्यावर आपण आपली मानसिक शक्ती आणि प्रगती खर्च करायची नसते हे मला कसे उमजले असते? त्यापुढे जाऊन मात्र, मिळालेल्या निंदेचा (अ/)स्वीकार न करता आपण फक्त चालत रहायचे जीवनाच्या शोधात, हे शिक्षण आले तुकारामांकडून . . .


माझे निंदक नसण्याइतपत काही मी चांगला माणूस नव्हे. जिथे असामान्यांना निंदक लाभतात तिथे माझ्यासारख्या अतिसामान्य माणसाने निंदक नसल्याची गोष्ट का करावी? प्रत्यक्षात मला फार निंदक लाभलेत याचा मला आनंद होतो. कधीकधी तर इतक्या निंदकांसाठी मी खरंच पात्र आहे का असाही प्रश्न पडतो. माझे निंदक माझ्या या न्यूनगंडाला कायमच पोटात घेतात यासाठी मी त्यांचा दुसऱ्यांदा ऋणी आहे. पहिल्यांदा, अर्थातच, निंदेसाठी.

निंदेला ज्या प्रकारे प्रतिसाद द्यायला हवा तसा देत नसल्याने हे लोक आणखीनच चिडत असावेत असं माझं निरीक्षण राहिलेलं आहे. कदाचित हा प्रतिसाद त्यांना द्वेष, मत्सर, अहमहमिका किंवा खुद्द निंद्येच्या परतफेडीत हवा असेल – माहीत नाही. त्याकडे मी फारसं कधी लक्ष दिलेलं नाही‌. कारण, माझी कोणत्याच निंदकाच्या निंदेला तक्रार नसते.

माझं रूप हे बऱ्यापैकी निंदनीय आहे हे मलाच माझं मान्य.‌ त्यामुळे याच्या तक्रारीचा प्रश्न मिटला. माझं व्यक्तिमत्व सुद्धा कुणाच्या रुचीत बसावं असं नाही. बोलण्याच्या बाबतीतील माझी रीत निंदकांचा आणखी एक विषय होऊ शकली असती, मात्र जास्त बोलण्याची सवय नसल्याने, हे टळलं‌. याउलट आता मी बोलत नाही हा निंदेचा भाग आहे. मजेदार.

माझी साध्यातील साधी गोष्ट लोकांना पटेनाशी होते. मी कुत्री-मांजरी पाळत नाही हा निंदेचा विषय व्हावा का? का व्हावा? किंवा मग मी कोणत्या सोशल मीडियाचा उपभोक्ता नाही हा व्हावा? याहून मी देवळात कधी जात नाही हा विषय बरा आहे की! कधी सिगारेट हातात धरली नाही, पार्टीच्या पायऱ्या चढलेलो नाही, जुगार खेळलेलो नाही, कोणत्या बाई-मुलीची छेड काढलेली नाही इतकंच काय तर साधा चहाही पीत नाही हे निंदेचे विषय असू शकतात ही बाब मला निंदकांमुळेच कळाली. किंबहुना या तऱ्हेवाईक वागण्यामुळेच माझी मानसिक स्थिती बरीच बरी आहे.

बरेच, बव्हंशी सगळेच लोक, काही भेटीतच माझ्या या अशा असण्याने आकर्षित होत असतात. मात्र तितक्याच वेगात ते माझे निंदकही होतात याला कुठेतरी माझा प्रामाणिकपणा कारणीभूत आहे. बहुदा या जगात आता सर्वात निंद्य प्रामाणिकपणाच आहे.

मी एक माणसासारखा माणूस असण्याआधी आधी लोकांना माझा अधिकारी हुद्दा, माझं शैक्षणिक यश, माझी आर्थिक सबलता, सामाजिक पात्रता, समृद्धी आणि सुबत्ता हे सगळं दिसत असल्याने या भोवतीच संभाषणे फिरत राहतात‌.

हे सर्व वैभव मला वारसा हक्कात मिळालेले नाही, माझ्या कोणत्या गतकाळातील – किंवा सध्या कैलासवासी असलेल्या – नातेवाईकाची ही कृपा नाही, सासरवाडीचा वरदहस्त नाही की नशीबाचे देणे नाही हे कळले की लोक आश्चर्यात रमतात. त्यावेळी त्यांचे डोळे विचारतात तशा अनीतीतून जन्मलेल्या पैशातून देखील हे आलेले नाही. मी हसत सांगतो की कोणत्या ब्राह्मणाकडे जाऊन मला हे मिळालेलं नाही की कोणा भोंदू बाबाच्या चमत्काराने आणि नेत्याच्या सिद्धीने मिळालेले नाही‌. सोबतंच मी कोणी अतिबुद्धिमान नाही . . .

परिस्थितीची जाणीव ठेवून सतत केलेल्या छोट्या-छोट्या परिश्रमातून मी आज येथे उभा आहे हे मी खरं कारण सांगणारच असतो मात्र ते ऐकण्याआधी लोक आडून माझी जात विचारतात. मीही न कचरता ती सांगून टाकतो‌. कारण, जी आपण मुळात मानत नाही, जी आपण केव्हाच सोडून आलो, ती बलामत आपल्याजवळ ठेवून काय करायची? ज्याला हवी त्याला ती वाटून टाकावी! माझ्या याच निर्णयाने मी बेधडक जात सांगून टाकतो आणि अनपेक्षितपणे ती ऐकताक्षणी आतापर्यंत असलेले माझे चाहते कळत-नकळतपणे ते माझे निंदक होऊन जातात. गंमत म्हणजे आत्ता तुम्ही विचार करत आहात त्या जातीतूनही मी येत नाही आणि तुम्ही कदाचित लिखाणावरून आधी अंदाज बांधला असेल तर तीही माझी जात नाही. असो.


माझे निंदक नसण्याइतपत काही मी चांगला माणूस नव्हे. याऊलट मला गरजेपेक्षा जास्त निंदक लाभलेले आहेत व पुढेही लाभत राहतील आणि मी त्यांचा कायम ऋणी राहीन.


स्तुतिसमवेत निंदा । केला धंदा उदंड ॥
तुका ह्मणे निवांत ठेलों । वेचित आलों जीवित्व ॥

– श्री तुकारामबोवांच्या अभंगाची गाथा (२३२९)





{fullwidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال