
शाळेच्या, माळावरच्या, मंदिराच्या, पीडब्ल्यूडीच्या, सोसायटीच्या किंवा पडीक जागेतल्या कोणत्याही मैदानावर बिनपगारी घाम गाळलेल्यांना काय मिळालं? चांगली शरीरयष्टी, कणखर मन आणि आठवणी यापलीकडे देखील मैदान आयुष्यात साथ देतं? कोणत्याही मैदानावर लहान मुलांवर मोठी मुले अन्याय करत असत तरीही मैदानावर आपण जात राहिलो यातून खरंच काही प्राप्त झालं?
बालपणीचा ‘खेळ’ सुखाचा. नंतर मोठ्यापणी नाहीतरी आयुष्याचा खेळ होतोच! माझ्याबाबतीत बालपणीही तितकासा उजेड नव्हता. त्यामुळे ही उक्ती माझ्यासाठी ‘बालपणीचा खेळ रडीचा’ अशी आहे. रडीचा डाव हा खेळ कसा असू शकतो? असा प्रश्न वाचकांस जरूर पडेल मात्र रडीचा डाव हाच माझा आवडता खेळ आहे हे मी (रडून) सिद्ध करून दाखवू शकतो! ते तूर्तास लांबणीवर. लेखाचं शीर्षक ‘रडीचा डाव – माझं श्रद्धास्थान’ असंही जमलं असतं. तेही तूर्तास लांबणीवर.
लहाणपणी आमच्या गल्लीत सगळी एकूणएक लहान मुले होती! आम्ही सगळे मिळून सटरफटर खेळ खेळत बसायचो. मोठ्यांच्या दृष्टीने मनोरंजन करण्यासाठी आम्ही ‘विदूषकगिरी’ करत असू. कालांतराने गल्लीबदल झाल्यावर मी सगळ्या मोठ्या मुलांत फेकलो गेलो आणि मी (खरोखर) विदूषक कसा आहे हे त्यांनी मला दाखवून दिलं! मोठ्या मुलांचे खेळ हे थोडेसे कठीण आणि आपसूकच चांगलेही होते. त्यांच्या खेळाने दैनंदिन जिंदगीला एक नवी रया आली. त्यांच्यात खेळायला गेल्यावर मी एकटा पडू लागलो, हरू लागलो. हा प्रकार अनुभवून माझा (मनातल्या मनात) तिळपापड होऊ लागला.
पूर्वी लहान मुलांचे खेळ घेणारा म्होरक्या म्हणून मी फार लोकप्रिय होतो (टोपननाव : फाटका बॉस); पण ही मोठी पोरं आल्यापासून माझी लोकप्रियता हळूहळू कमी होत होती. ‘माझ्या प्रसिद्धीला उतरती कळा लागली होती’ ही गोष्ट मला दिवसा झोप येऊ देत नव्हती की रात्री जागं राहू देत नव्हती! या गोष्टीच्या तणावात मला जेवल्यानंतर भूक लागत नसे की पाणी पिल्यानंतर तहान लागत नसे! याचा माझ्या बालमनावर असा काही आघात झाला की नाक दाबताच मला श्वास घेणेही जड जाऊ लागले! उपाय एकच – मोठ्या मुलांमध्ये खेळून, जिंकून लोकप्रिय होणे.
मोठ्या मुलांचे खेळ अवघड, जे की मला जमत नसत! वास्तवात मी कधीच ते ‘जमवून’ घेण्याचा प्रयत्नही केला नव्हता. कारण, मेरे पास माँ थी! मोठी मुले ज्यावेळी मला खेळात घेत नसत त्यावेळी मग मी आईकडे तक्रार करत असे! तेव्हा आई त्या मुलांना मला खेळायला घेण्यास भाग पाडत असे. पुन्हा जेव्हा माझ्यावर राज्य यायचं किंवा माझ्या चुका व्हायच्या तेव्हा मोठी मुले वचपा काढत, मला रडवत, टिंगलटवाळी करत आणि माझ्यावर हसत! तेव्हाही आई नामे शस्त्रच कामी आलं. मी पाणी प्यायच्या निमित्ताने घरात गेलो की दहा मिनिटाच्या आत आई मला बोलावून घ्यायची – काय योगायोग!
योगायोगाने या योगायोगांचं प्रमाण वाढलं आणि मोठी पोरं राज्य आल्यावर मला घरी सोडेनाशी झाली. (आपल्याकडे ‘राज्य’ येणे ही दुख:दायक बाब असल्याची उपरती तेव्हाच होऊन मी असत्तापिपासू झालो!) त्यावेळी मी हात-पाय झाडायचो, कांगावा करायचो, रडायचो, सगळ्या अंगाला (मनातल्या मनात) माती फासून आकाशपाताळ एक करायचो, दहा मोठ्या माणसांना एकत्रित करायचो आणि मोठ्या मुलांविषयी अफवा पसरवायचो की लगेच आई माझ्या मदतीला धावून यायची. ती त्या मोठ्या मुलांना खवळायची, त्यांचे खेळ बंद करायला सांगायची. त्या पोरांच्या आया प्रकट होत त्यांना बोल लाऊन किंवा (चांगल्या) प्रसंगी बडवून थेट घरी नेत – हाच माझा रडीचा डाव!
मी आजही हा रडीचा डाव वापरतो. ‘रडीचा डाव जिंकून देत नाही; पण निदान हरू तर देत नाही ना!’ हे तत्त्व मला पूर्वीपासून फारच प्रिय असल्याने मी रडीचा डाव खेळत राहणार. जेव्हा केव्हा कोठे माझ्या मनाप्रमाणे घडणार नाहीत तेव्हा मी हे रडीचे फासे टाकणार. एकंदरीत रडीचा डाव हाच माझ्या बालपणातील सर्वाधिक आवडता खेळ जो मी तरूणपणातही खेळतो!
मस्करीचा भाग वगळला तर या काळतच मी (मानसिक) सुदृढ झालो. लोखंडपाणी, अप्पारप्पी, लिंगोरच्या(लगोरी), भोवरा, पाच-तीन-दोन, गोट्या, बॉक्स क्रिकेट, कॅरम, बुद्धीबळ, लपाछपी, विशामृत, दहा-वीस-तीस सगळं खेळताना रडलो पण पुनः खेळात जाण्याचं सोडलं नाही आणि पोरांनी रडवण्याचं (यामुळे मला बारावी नापास झाल्यावर जगण्याची ताकद मिळाली)! म्हणून रडीचा डाव लक्षात राहिला.
पांढरपेशा माणसाच्या आयुष्यात काय काय घडत नाही? कधी सामाजिक दबावाने (peer pressure) एकटं पडावं लागतं, तर कधी नेट जातं, कधी प्रवाहाच्या बाहेर निघावं लागतं, तर कधी माणूस हॉटस्पॉटच्या रेंज बाहेर जातो, कधी इतरांच्यात सामिल न होण्याच्या भीतीने अपप्रकार सहावे लागतात, तर कधी नेटपॅकच संपतो, कधी शारीरिक-मानसिक-भावनिक-आर्थिक छळातून जावं लागतं, तर कधी आईच्या (बायकोच्याही समजू शकता) सिरियलवेळी लाइट जाते, कधी अकारण खच्चीकरण अनुभवावं लागतं, तर कधी कधी सरांना वहीच्या मागील पानावर (जीवशास्त्रातील) साद्यंत आकृत्या सापडतात, कधी प्रेमाने मनाचा (किंवा अतिप्रेमाने अस्थिंचा) भंग होतोत, तर कधी नेमकं डुलकीच्या वेळी मालक येतो, कधी ती ‘जेवलीस का?’ च्या उत्तरादाखल ब्लॉक करते, तर कधी बायको (न सांगता) अचानक माहेरहून परतते; पण म्हणून दरवेळी यापुढे प्रकाश नाहीच असं मानण्याचं कारण नाही हे त्या रडीच्या डावाने दिलं. मैदानात लुटूपुटुचे खेळ सुरू राहतात फक्त ते खेळायला आपण राहिलो पाहिजे; हार-जीत असे काही नसते फारसे. आपण या रडण्या-चिडण्यातून खिलाडू झालो की नाही हे महत्वाचे.
मैदानात अपयशाला पचवून शिल्लक राहण्याचे कसब नकळत मिळाले नसते तर आजपर्यंत मीही हॉस्टेलच्या कोणत्यातरी खोलीत, ऑफिसातल्या कोपऱ्यात, जेलच्या बराकीत किंवा नसल्यास घरीच पंख्याला दोरखंड जवळ केला असता. किंवा अट्टल व्यसनी झालो असतो.
शेवटच्या दोन ओळीत जे मांडलं त्या विचारांपर्यंत जाण्यासाठी लागणारं दडपण/नैराश्यही कधी मला शिवलेलं नाही ते या रडीच्या डावामुळे. ज्यांना शिवलेलं आहे त्यांच्या रक्तचाचणीत ‘बालपणी मैदानी खेळांची कमतरता’ सापडेल का?
असो.
तुमच्या बालपणीचा आवडता खेळ कोणता होता? कोणता खेळ आजही आठवतो? आणि माझ्यासाठी जे रडीच्या डावाने सांधलं गेलं ते आयुष्य तुमच्यासाठी कोणत्या खेळाने/सवयीने सांधलं?
{fullwidth}