
कवीच्या कवितेने अकस्मात बदल होत असतात. म्हणजे गाढ झोपलेले खडबडून जागे होतात, टक्क जागे डाराडूर झोपतात, बसलेले उठून जातात, अहिंसावादी प्रसंगी हिंसक होतात सोबतच कविसंमेलनाच्या गल्लीत कधीच ‘ट्रॅफिक जॅम’ होत नाही आणि चमत्कारीकरित्या घरी पाहुणेही येत नाहीत अगदी शेजारी कवी राहतो म्हणलं तरीही . . .
कवीच्या कवितेनं
पाऊस पडत नसतो
पाऊस सोडाच
नळाला धड वेळेवर
पाणीही येत नाही दोन टाईम
कवीच्या कवितेनं
फुलं फुलत नसतात
फुलं फुलणं तर दूरच
प्लास्टिकच्या फुलाला आभासी
येत नसतो गंधही
कवीच्या कवितेनं
माणसं नसतात बदलत
बदलणं राहिलंच
बुजतही नाहीत ती
एकमेकाची आईबहिण काढताना
कवीच्या कवितेनं
कोणतीही सत्ता
कोसळत नसते
लोकशाहीच काय साधं
रस्त्याच्या रुंदीकरणात
सापडलेलं जुनाट
वाचत नसतं झाडही
कवीच्या कवितेनं
त्याचं वजन पडत नसतं गर्दीवर
खरंतर उठसूट कविता झोडतो
म्हणून मुलंचं त्याला
पालकसभेला नेत नसतात
इतकंच काय
कवीला कवितेच्या जोरावर
नाक्यावरचा मारवाडीही देत नसतो
किराणा उधार
बाकी सत्याला सत्य म्हणायची
ताकद असते कवीच्या कवितेत
आणि म्हणून फक्त याच कारणासाठी
शोधशोधून मारले जातात कवी
एकामागोमाग एक
{fullwidth}