झुंजार – प्रीती आगळे

[वाचनकाल : ३ मिनिटे] 
प्रीती आगळे, priti agale

धार्मिक पायावर आधारलेल्या सामाजिक उतरंडीत सर्वाधिक शेवटी ठेवले गेले स्त्रिला. आपसूकच मग सर्वाधिक बंधने तिच्यावरच आली. शिक्षणाने यात बदल घडून आले असतील तरी आजही या बंधनांतून तिला मुक्त होता आलेले नाही. काही झुंजार मुली, महिला मात्र या जोखडातून मुक्त होण्यासाठी धडपडतात, संघर्ष करतात आणि एक नवी‌ वाट निर्माण करतात . . .

काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पाहण्यात आला. तो मनात रुतून बसला इतका की त्यावर लिहीलेच पाहिजे असे वाटू लागले. पुण्यातील ‘प्रीती आगळे’ या महिलेने समाजातील रूढी परंपरांची तमा न बाळगता एक क्रांतिकारी उपक्रम केला – त्या विधवा असून त्यांनी नटूनथटून सार्वजनिक हळदी-कुंकवाचे आयोजन केले!
     खरेतर आपल्याकडे अजूनही  विधवा आणि हळदी-कुंकू हे शब्द एकत्र वापरल्यावर सुद्धा भुवया उंचावतात. म्हणूनच हा आगळावेगळा प्रयोग करीत असताना अर्थातच त्यांना विरोधाचा आणि टिका-टिप्पण्यांचा सामना करावा लागला परंतु, सुदैवाने त्यांच्या सासरकडच्या मंडळींनी  सहकार्य केले. या सहकार्यातूनच त्यांना हा उपक्रम यशस्वी करता आला आणि मुख्य म्हणजे त्यांना याकरीता चांगला प्रतिसादही मिळाला.

प्रीती आगळे ह्या एक उच्चशिक्षित महिला असून पुण्यातील एका नामांकित कंपनीत काम करतात. मागील वर्षी कोविडमुळे त्यांचे पती आपल्या अपत्याला मागे ठेवून मरण पावले. या संकटाचा धैर्याने सामना करीत प्रीती यांनी आपल्या चिमुकल्यास आणि कुटूंबालाही खंबीरपणे सांभाळले. त्यासाठी त्यांना स्वतःला आधी जास्त कणखर बनवावे लागले, असे त्यांचे म्हणणे आहे.
     व्हिडिओतील आपल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की त्या अगदी लहान असतानाच त्यांचे वडील वारले. त्यानंतर सहाजिकच त्यांच्या आईला कुठल्याही धार्मिक कार्यात सहभागी होता येत नसे, हळदी-कुंकू, लग्नसमारंभ काही करता येत नसे किंवा अशा प्रसंगी कोणाकडे जाताही येत नसे. हे सगळे पाहत प्रीती मोठ्या होत होत्या, अर्थातच, त्यांना हे नामंजूर होते; पण वय कमी असल्याने त्या आईसाठी खंबीरपणे उभे राहून काही करू शकल्या नाहीत. मात्र आता जेव्हा दुर्दैवाने आपल्या मुलीवरही (आईला वैधव्यात पाहण्याची) तशीच परिस्थिती ओढावलीये तेव्हा आपण तिला नाराज होऊ द्यायचे नाही असे ठरवून त्यांनी हा निर्णय घेतला.
     पती गेल्यानंतर जी पहिलीच संक्रांत आली ती त्यांनी सुवासिनीसारखा पूर्ण साजश्रृंगार करून, हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून, वाण देऊन, अगदी साग्रसंगीत साजरी केली व आपल्या पतीला अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांचा हा आत्मविश्वास बघून भावनिकही वाटत होते व अभिमानही वाटत होता.
     समाजात लोक कितीही सुशिक्षित असले तरी अजूनही विधवा स्त्रियांनी कसे वागावे, कसे रहावे याची काही लिखित-अलिखित नियम आहेत. या नियमांतून भरपूर बंधने त्यांच्यावर लादली गेली आहेत. अशी स्त्री थोडी जरी व्यवस्थित तयारी करून घराबाहेर पडली तरी मागे लोकांच्या तक्रारी सुरू होतात.
     बर्‍याच ठिकाणी एखाद्या विवाहितेला कुंकू, मंगळसुत्र, बांगड्या घालून विवाहित दिसण्याचा आणि तीच स्त्री विधवा झाल्यास तिला हे सगळं त्यागून विधवा दिसण्याचा आग्रह केला जातो. ही असली काही बंधने पुरूषांना तर नसतात मग स्त्रियांनाच या बंधनात अडकवून ठेवण्यात काय अर्थ आहे?
     एखादी महिला कुमारिका असो, विवाहित असो किंवा विधवा असो – तिला मनासारखी वेशभूषा व श्रृंगार करण्याचेही स्वातंत्र्य असू नये ही शोकांतिकाच आहे, बाकी काही नाही!
     नवर्‍याच्या मृत्यूने आधीच खचलेल्या स्त्रिला समाजातील प्रथांच्या नावाखाली अजून मानसिकरीत्या दुबळे बनवणे कुठेतरी थांबायला हवे, थांबवायला हवे. अशा स्त्रियांचे दुःख दूर करण्यासाठी व त्यांना आत्मबळ प्राप्त करून देण्यासाठी त्यांच्या कुटुंबासोबतच समाजानेही हातभार लावण्याची आवश्यकता आहे.
     ज्या दिवशी विधवा स्त्रियांना देखील आपल्या मनासारखे वागता येईल व लग्न, मुंज व इतर सगळ्या धार्मिक कार्यक्रमात संपूर्ण बरोबरीने सहभाग घेता येईल त्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतंत्र होईल असे वाटते.

प्रीती आगळे यांनी दाखवलेली हिंमत जेव्हा अशा सगळ्या स्त्रिया कृतीतून दाखवतील तेव्हा कोणी कितीही विरोध केला, बंधने लादली तरी ती सगळी बंधने आपोआपच गळून पडतील!
     प्रीती यांनी म्हटल्याप्रमाणे, पती गेल्यानंतर निराश होऊन नुसते जीवन  ‘काढायचे’ का मग मुलांसाठी, कुटूंबासाठी आणि स्वतःसाठीही आनंदी राहून जीवन ‘जगायचे’ हे आपले आपणंच ठरवायला हवे!


• संदर्भ :
 
• वाचत रहा :


आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال