[वाचनकाल : ४ मिनिटे]
ओडिशात गेल्या दहा दिवसांत तीन रशियन व्यक्तींचा मृत्यू झाला. त्या घटना वेगवेगळ्या असल्या, तरी त्यांची कडी जोडलेली आहे रशियातील सद्यस्थितीत. युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून तेथे अनेकांचा अशाच प्रकारे मृत्यू झाला आहे. भारतातील या घटना म्हणूनच संशयास्पद ठरत आहेत. त्या गूढाचा हा लेखाजोखा . . .
या बातमीत फारसा कोणाला रस असण्याचे कारण नाही. रशियातील एका गोदीचे प्रमुख कालवश झाले, ही बातमी आपल्या वृत्तपत्रांसाठी फारफार तर ‘थोडक्यात’च्या लायकीची. ते सेंट पीटर्सबर्गमधील ॲडमिराल्टी शिपयार्डचे महासंचालक होते – ‘ॲलेक्झँडर बुझाकोव्ह’ हे त्यांचे नाव. आपल्या नौदलातील बऱ्याच पाणबुड्यांची बांधणी त्यांच्या देखरेखीखाली झालेली आहे एवढेच. बाकी मग त्यांचे नाव बिनमहत्त्वाचेच.
त्यामुळे गेल्या २४ डिसेंबरला त्यांचा मृत्यू होतो, आदल्या दिवशी एका पाणबुडीच्या जलावतरण सोहळ्यात ते सहभागी होतात आणि दुसऱ्या दिवशी अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी जाहीर होते, ते कशामुळे मेले हे मात्र लपवून ठेवण्यात येते, या गोष्टी आपल्यासाठी तशा अदखलपात्रच. पण, नेमक्या त्याच दिवशी इकडे भारतात असा आणखी एक मृत्यू झाला आणि त्या गोदीप्रमुखांची बातमी अचानक लक्षणीय ठरली.
भारतातील ही घटना घडली ओडिशातील ‘रायगडा’ जिल्ह्यात. तेथील एका हॉटेलात काही रशियन पर्यटक उतरले होते. २४ डिसेंबरच्या रात्री एकाचा मृतदेह हॉटेलच्या पहिल्या मजल्याच्या छतावर आढळला. असे सांगण्यात येते की, तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून ते पडले, बहुधा मद्यप्राशन केले असावे त्यांनी, त्यामुळे तोल गेला असावा. त्यांचे शवविच्छेदन झाले, पण त्यांचा ‘व्हिसेरा’ काही जपून ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांना दारू जास्त झाली होती की काय ते कळायला मार्ग नाही.
तशातच असेही सांगण्यात येते की, त्याच हॉटेलात अवघ्या दोन दिवसांपूर्वी, २२ डिसेंबरला, त्यांच्या एका मित्राचा मृत्यू झाला होता, त्यामुळे ते दुःखात होते. असेलही तसे. आपण सारे कायदाप्रेमी नागरिक. अशा घटनांत पोलीस जे सांगतात तेच ब्रह्मवाक्य मानून चालणारे, पण तरीही या घटना वाटतात तेवढ्या साध्या नाहीत, असा जो संशय निर्माण व्हायचा तो झालाच. याचे कारण त्या मेलेल्या रशियन व्यक्ती.
त्यातील एकाचे नाव होते ‘पाव्हेल अँतोव्ह’. मॉस्कोपासून दीडशे किमी अंतरावर व्लादिमीर नावाचा प्रांत आहे. तर तेथील विधानसभेचे ते सदस्य. पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाचे स्थानिक नेते आणि अब्जाधीश उद्योजक. ‘व्लादमिस्क स्टँडार्ट’ या मांसप्रक्रिया उद्योगाचे ते संस्थापक. वय ६५. दुसऱ्या व्यक्तीचे नाव होते ‘व्लादिमीर बिदेनोव्ह’. वय ६१. ते पाव्हेल यांचे मित्र. एकत्र आले होते ते येथे, एकाच हॉटेलात राहात होते; तर २२ डिसेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. खूप वाईन प्यायले होते, त्यामुळे गेले असे सांगण्यात येते.
यातील अँतोव्ह यांचे नाव गेल्या जूनमध्ये तिकडे बरेच चर्चेत आले होते. त्यांनी कुणाला तरी एक व्हॉट्सॲप संदेश पाठविला होता. त्यात युक्रेनवरील क्षेपणास्त्र हल्ले हा दहशतवाद आहे, असे म्हटले होते. ही ‘पुतिन’ यांच्यावरची घोर टीका. मोठी खळबळ माजली त्याने. नंतर अँतोव्ह यांनी सारवासारव केली. आपण असा संदेश पाठवलाच नव्हता, पुतिन यांच्या ‘विशेष लष्करी मोहिमे’ला (युक्रेनवरील आक्रमणाचे हे सरकारी नाव!) आपला पाठिंबाच आहे असे त्यांनी जाहीर केले. तर ते म्हणे हॉटेलच्या खिडकीतून पडून मेले.
युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अशी ‘वरून पडून मरण्याची’ साथ आली असावी रशियात. ऑगस्टपासून किमान सहा रशियन उद्योजक वा नेते वा अधिकारी अशा प्रकारे ‘पडून मेले’ आहेत. शिवाय अनेक जणांनी गूढरीत्या आत्महत्या केलेली आहे. काहींची हत्या झालेली आहे. अँतोव्ह हे त्या यादीतील
पुढचे नाव. त्यांच्या मृत्यूनंतर आठ दिवसांत ओडिशात आणखी एक रशियन व्यक्ती मरण पावली. त्याचे नाव ‘मिल्याकोव्ह सर्गेई’. वय ५१. चितगावहून मुंबईला चाललेल्या ‘एम.बी. अल्गना’ या जहाजाचा तो मुख्य अभियंता. जहाज पारादीप बंदरात नांगरलेले असताना, ३ जानेवारीला पहाटे साडेचार वाजता तो मेला. हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस सांगतात, पण खरेच ते तसे आहे का?
या सर्व घटनांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. मुळात अँतोव्ह आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी पर्यटनासाठी ओडिशातला रायगडा हाच जिल्हा का निवडला? या जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरही चार-पाच सामान्य पर्यटनस्थळे दिसतात. तेथे या मातब्बर मंडळींनी का जावे? दुसरी बाब अँतोव्ह यांच्यासारखा उद्योगपती-राजकारणी, मित्र हृदयविकाराने गेला म्हणून इतका दारूत बुडेल की खिडकीतून पडून मरेल? अशा व्यक्तींचे काळीज इतके कोमल असते? अँतोव्ह आणि बिदेनोव्ह यांच्या पार्थिवाचे ओडिशातच दहन करण्यात आले हेही विशेष. त्यांचा व्हिसेराही जतन करून ठेवण्यात आलेला नाही. यामुळे तर संशयाला आणखी जागा निर्माण झाली आहे.
व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांचे टीकाकार एका मागोमाग एक गायब होताना दिसतात. त्यांना देशद्रोही, भ्रष्टाचारी ठरवून वगैरे तुरूंगात डांबणे हे तर नित्याचे. हुकूमशहांच्या स्पर्शाने कायद्याचे रूपांतर नेहमीच हिंस्त्र प्राण्यात होते. रशियात तेच घडत आहे. पण पुतिन यांचे क्रौर्य असे की, त्यांच्या काही विरोधकांना थेट मारूनच टाकण्यात आले आहे.
‘अलेक्झांडर लितव्हिएन्को’ हा रशियन हेर हे त्याचे एक उदाहरण. त्याच्यावर लंडनमध्ये विषप्रयोग करण्यात आला होता. ‘सर्गेई स्क्रिपाल’ हा रशियन गुप्तचर आणि त्याची कन्या ‘युलिया’ हे सुदैवी. त्यांच्यावरही ब्रिटनमध्ये विषप्रयोग झाला होता. आपल्या देशात असे कृत्य केल्याबद्दल ब्रिटनने २३ रशियन अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. त्यातील बरेचसे गुप्तचर होते – आपण असे काही केलेले नाही. रशियाला फारसे न दुखावणे अनुसरून हे घडते आहे. हे आपले सध्याचे धोरण.
‘फ्रेडरिक फोर्सिथ’ यांच्या ‘ओडेसा फाईल’मध्ये अखेरीस खलनायकांना शिक्षा होते. आपल्या ‘ओडिशा फाईल’मध्ये तशी शक्यता नाही. कारण येथे ना कोणाची हत्या झाली, ना कोणी मारले गेले. पोलीस अहवाल हेच सांगत आहेत.
• संदर्भ :• वाचत रहा :