सुखाचे मरण


oasis in the ocean of trees
खजुराच्या झाडांनी नटलेलं मृगजळ


मरण कोणालाच शोधत नाही तरी त्याला सर्व सापडतात! जन्म आपल्या हातात नाही आणि बव्हंशी मरण सुद्धा नाही – निदान आपण ते स्वतःहून ओढावून घेत नाही तोवर तरी! या मरणात ‘सुखाचे मरण’ नावाचा काही प्रकार असू शकतो का? कदाचित नाही किंवा कदाचित हो . . .


तो तिथे कसा आला, कुठून आला, किती चालला, किती चालायचंय सगळे हिशोब शून्यात जमा होऊ लागलेले. वाळवंटाने त्यातला प्राण खेचला होता.

वाळवंटातून तो बराच मागून चालत आला – भले हिरवळ का लागे ना पण – कुठेतरी वाळवंट संपेल या आशेने .‌ . . पाऊल-पाऊल टाकत आला. सुरुवातीची आशा, नंतरची निराशा आणि आताचा हा स्मृतीभ्रंशाचा काळ . . ‌.

दिशा जाणवेणाशा झाल्या. पाणी . ‌. ‌. पाणी . . . स्थळांनुसार देव बदलतो. भुकेल्याचा देव भाकरी, वाळवंटात देव पाणी . . .

सुरुवातीला मृगजळ दिसलं की धावत सुटायचा. नंतर-नंतर तर धावायची शक्ती उरली नाही. ‘माणूस दमल्यानंतर ही खूप अंतर चालू शकतो.’ इमरसन म्हणाला. कोण इमरसन? इथे फक्त सूर्य, तप्त रेखीव वाळवंट आणि क्षणाक्षणांना भेटत चाललेला अंत! हिरवळीचा रंग कोणता? तांबडा की कसं?

तेवढ्यात गरम झालेल्या झाडांवर दूर कुठेतरी पाण्याचा भास – मात्र हेही मृगजळचं असणार कदाचित – मरणाच्या भीतीने आणखी जिवंत वाटणारा आभास निव्वळ. जवळ जाताचं विरणारं सत्य!

अविश्वासामुळे थोडकं अंतर चालायला सुद्धा बराच वेळ गेला.

जोपर्यंत पोटात कोमट पाणी जाऊन शरीर आनंदत नाही तोपर्यंत त्याला पाण्यावर विश्वास नव्हता – आता बसला. पाणी! पाणी! मनसोक्त पाणी पिलं तरीही शिल्लक! इतक्या मोठ्या तळ्यातल्या पाण्याचं करायचं काय?

जणूकाही कधी इतकं पाणी पाहण्यातच आलं नाही असा बेभान होऊन तो ओरडला, नाचला, अनावर झाला. मग शेवटी कपड्यांशी पाण्यात तरंगला. पोहत तळ्याच्या मध्यभागी पोहोचला – आनंद-आनंद! अतोनात हालांतून पोळून निघालेलं शरीर या हर्षाने सुखावलं, विश्रांतीसाठी स्नायू आपोआप शिथील झाले, बंद पडले . . .


वाळवंटात बुडालेला हा पहिला माणूस.





{fullwidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال