वास्तु(दिशाभूल)शास्त्र


colourful hat of magician
असल्या थोतांडाला ‘शास्त्र’ म्हणावे हे सुद्धा माझ्या ‘गणितात’ बसत नाही!


या घडीला जर तुम्हाला कोणतीही थाप खपवायची असेल तर फक्त ‘शास्त्रांत असंच सांगितलंय’ हे एक वाक्य थापेसोबत जोडावे.‌ याच्यानेती थाप निर्विवाद खपते कारण, शास्त्र कोणी वाचायला जात नाही. आणि यामुळेच काही भयानक थोतांडांचा शास्त्र म्हणून उदय झालेला आहे. नुकत्याच एका परमपूज्य-जींनी ज्याप्रकारे शास्त्रीय म्हणून सोशल माध्यमांच्या मदतीने पत्रकारास ‘घोळवले’ आहे त्या घडीवर हरेक ‘शास्त्राचा’ विचार करणे आवश्यक आहे . . .


तशा अवस्थेतच मी प्रसाधनगृहाच्या पायऱ्या चढून वर पोहोचलो. तिथे बसलेल्या रखवालदाराची नजर चुकवून (प्रसाधनगृहाला रखवालदार ठेवावा लागतो म्हणजे खरोखरच आपण कलियुगात आलो आहोत असा भास होतो) हळूच मी आत सरकण्याचा प्रयत्न करून पाहिला – जो की फोल ठरला. त्याचं असं आहे की येथे ‘माघारी येताना देतो’ असलं कारण चालत नाही. गरजवंताला अक्कल नसते तसेच त्याला ‘जाताना’ भांडण्यासाठी वेळही नसतो! मात्र जाऊन आल्यावर तो भांडू शकतो म्हणून जातानाच त्याच्याकडून पैसे घेतले जातात. मी चरफडून दोन रुपये त्या काळ्याकभिन्न जांभा दगडाच्या कडाप्प्यावर ठेवले.

“वीस रुपये - वीस.”

“काय? वीस? लघवीला जायचंय.” मी स्पष्ट केलं.

“त्याचेच वीस रुपये.”

“काय नाष्ट्याची पण सोय आहे का आत?”

त्या व्यक्तीच्या नजरेतील राग जाणून मी पटकन बाहेर आलो आणि आपण घाईत ‘उपहार’गृहाला ‘प्रसाधन’गृह तर वाचलं नाही ना याची खातरजमा केली – घाईत चुक होऊ शकते पण यावेळी ते – प्रसाधनगृहचं होतं.

आता जर तुम्ही मानवी मुलभूत हक्कांचे वीस रुपये मागत असाल तर व्यक्ती ‘जाताना’ही भांडायचाच. शाळेतील मास्तरला करंगळी दाखवतात त्याप्रमाणे प्रत्येक प्रसाधनगृहात करंगळी दाखवून चेहरा कसानुसा करून फुकटात ‘मोकळा’ होणारा मी – सुटाने ही सोय सुद्धा नाकारली. सुटाने लाज आणण्याची दिवसातील ही तिसरी वेळ.

“वीस रुपये, मी त्याला विचारलं, कशाचे?”

“आत जायचे.”

“बाहेर आल्यावर अठरा रुपये माघारी देणार आहात का?”

”नाही.”

“मग काय काही वीस रुपये ’वसूल’ करूनच बाहेर यायचं का?” मी चिडलो. कदाचित सुट पाहून तो मला फसवत असावा असंही मला वाटलं. “मी काय अलिबाग वरून आलेलो नाही. इथलाच आहे मी.”

“अभिनंदन! तरीही वीसच रुपये.”

‘अरे कशाचे वीस रूपये रे’ याच्या क्रियापदात दोन शिव्या जोडून सरळ (धावत! कारण माझ्याकडे वेळ कमी होता!) आत निघावं असं मला वाटलं; पण त्याची तब्येत पाहता मी तसं केलं नाही.

गरजवंताला भांडण्यासाठी वेळ नसतो तसाच स्वाभिमानही नसतो. मी जमेल तितक्या मार्दवात विचारलं. “वीस रुपये का?” हा प्रश्न योग्य होता.

“वीस रुपये कारण . . . कारण हे प्रसाधनगृह वास्तुशास्त्रानुसार बांधलंय!”

“काय?”

“वास्तुशास्त्र!”

“वास्तुशास्त्रानुसार बांधलंय म्हणजे नक्की काय केलंय?” माझ्या आवेगाची जागा आता उत्सुकतेने घेतली होती.


मुळात वास्तुशास्त्रासारख्या कंडम बाबींवर माझा विश्वास मुळातच कमी. त्यापुढे जाऊन या असल्या थोतांडाला ‘शास्त्र’ म्हणावे हे सुद्धा माझ्या ‘गणितात’ बसत नाही. सत्यनारायण, नारायण नागबळी, जागरण गोंधळ यांनी असल्या अंधश्रद्धांवरचा माणसांचा विश्वास उडू लागला तो मूळ व खऱ्या विज्ञानवादी शिक्षणाने. मग यावर ज्यांचं पोट होतं त्यांच काय? तर त्यांनी मग मोठ्या शिताफिने विज्ञानाचा वर्ख चढवून त्यात राशीभविष्य‘शास्त्र’ आणि वास्तु‘शास्त्र’ हा कचरा बांधून द्यायला सुरुवात केली. विज्ञानाने आपल्या संस्कृतीतील (निदान) काहीतरी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं असं कोणी म्हणलं की भारतीय मन त्याच्याकडे टुणकन उडी मारून कसं धावतं याचा ढळढळीत पुरावा म्हणजे वास्तुशास्त्र होय. दारुडा नैऋत्य दिशा पाहून दारू सोडत नाही. भुकेलेला आग्नेय आणि तहानलेला उत्तर दिशा पाहून जेवण घेत नाही, पाणी पीत नाही किंवा गुंगी चढलेला दक्षिण दिशा पाहून झोपत नाही, नवरा-बायको दिशा पाहून भांडत अथवा समागम करत नाहीत आणि घरावर बरकत-संकटे दिशा पाहून येत नाहीत. या अगदी सामान्य ज्ञानाच्या चिंधड्या वास्तु(दिशाभूल)शास्त्राने कशा उडवल्या असतील याचं मला कधीकधी फार आश्चर्य वाटतं – तसं नेहमीच वाटतं पण मी याकडे फारसं ध्यान देत नाही. या वास्तु(दिशाभूल)शास्त्राची सर्वात मोठी खंत जर माझ्या मनात कोणती असेल असेल तर ती हीच की या तथाकथित शास्त्राने पछाडलेले सर्वाधिक ‘बकरे’ हे सुशिक्षित आहेत . . . निदान त्यांचं शैक्षणिक जीवन तरी त्यांना सुशिक्षित दाखवतं. वास्तु(दिशाभूल)शास्त्राचे चोचले हे फक्त पैसेवाल्यांचे आहेत असं मी कालपर्यंत छाती ठोकून सांगितलं असतं. आजची परिस्थिती मात्र फार वेगळी दिसते. टोलेजंग इमारतीत घडताना वास्तुशास्त्र तसंच पळून जातं जसं एखाद्या ढाब्यात गेल्यावर ‘आडवं चिरलेलं लिंबू खायचं नसतं’ हा नियम! दहा उभे-आडवे छेद दिलेलं ते लिंबू खाताना जसा ‘चेहरा’ आंबट होत नाही तसंच मोठ्या इमारतींत घर घेताना वास्तुशास्त्र आडवं येत नाही. हल्ली आता सोसायटीच्या ठेकेदारांनी सुद्धा ‘वास्तुशास्त्रानुसार बांधलेल्या सोसायट्या’ बनवायला घेतल्यात हे एका फलकावर हे वाचून माझा ‘चेहरा’ आंबट झालेला आठवतो. हल्ली वास्तुशास्त्रासाठी मध्यमवर्गीय लोक किंवा गरीब घर‘फोडी’ करून घेतात. ‘घर काय एकदाच होत असतं’, ‘धंद्याला बरकत तर आली पाहिजे’, ‘कुटुंबाला त्रास काय उगाच होत नसतात’ ही असली पट्टीतली वाक्ये चोजिवणे हा वास्तु(दिशाभूल)शास्त्रज्ञांचा आवडता छंद आहे.


“वास्तुशास्त्रानुसार बांधलंय म्हणजे बसल्याक्षणीच पोट मोकळं! आणि उभं राहिल्याक्षणीच ओटीपोट!” त्याने मोठ्या अभिमानाने सांगितलं.

“ते तर इतर सगळीकडेच होतं की?” माझा प्रश्न. “ज्यांना बद्धकोष्ठता, मूळव्याध वगैरे आहेत त्यांचंही होतं की कसं?”

“हो. हो. होतं की!” त्याचा दुर्दम्य आत्मविश्वास.

“तसं जर असतं तर इथे ‘इतकी मोठी रांग कशाची?’ हे विचारायलाच लोक जास्त आले असते एवढी तोबा गर्दी जमली असती!” मी म्हणालो.

“ते सोडा हो.”

“हो, त्याकरिताच इथे आलो आहे!”

“नाही म्हणजे तुम्ही एकदा जाऊन तर या, बघा योग्य दिशेस बसून प्रातर्विधी आटपल्यास अंगात अशी ऊर्जा संचारते की वारंवार या ऊर्जेचा अनुभव घ्यावासा वाटतो.” त्याच्यातील ही अतिरिक्त ऊर्जा पाहून मलाच कसंतरी झालं.

“आणि मग तुम्ही आत पाण्याची बादली, मग वगैरे सुद्धा दिशा पाहूनच ठेवले असतील?” मी मिश्किलपणे विचारलेलं त्याने जरा गंभीरतेने घेतलं.

“हो. हो. अगदी वातायान सुद्धा दिशेनुसार आहे!”

“वातायान . . .” मी आत केल्या जाणार्‍या विविध नैसर्गिक क्रिया आणि त्यासाठी लागणारी संसाधने सर्वकाही आठवून पाहिलं. “. . .

वातायान म्हणजे?”

“खिडकी. खिडकी!”

“बरोबर.” शेवटी गरजूवंताला अक्कल नसते हा नियम माझ्यावर खालून अंमल चढवू लागला होता. चटकन वीस रुपये टाकून अद्भुत ऊर्जेचा संचार झालाच तर करून घ्यावा हेच मला सुचत होतं. मन मानत नव्हतं आणि सूट बाहेरच्या भिंतीजवळ पुन्हा जाऊ देत नव्हता. त्या भिंतीचा उपभोग घेणारे अडाणी लोक सुद्धा मला त्या घडीला रास्त आणि प्रगल्भ भासले. निदान त्यांच्या अज्ञानात सुख तरी होतं. शेवटी हो नाही करता-करता मी तिथून बाहेर निघालो. जाताना त्याने ‘शेवटी किती देता बोला?’ असं विचारलही होतं. थोडी घासाकीस करून मी दहा रुपयांपर्यंत त्याला आणलंही असतं. मात्र ते वास्तु(दिशाभूल)शास्त्राचं थोतांड थोडं जरा जास्तच होतं. शेवटी स्थानकाबाहेर (आणि सुट काढून) फिरताना आणखी एक प्रसाधनगृह दिसलं जिथे ‘करंगळी दाखवून’ माझी सुटका झाली – एकदाची.


अनुकरणाचा नियम निदान वास्तु(दिशाभूल)शास्त्राला तरी लागू होत नाही हे मला कळालं ते असं. आणि वास्तुचं शास्त्र म्हणून जे सांगितलं जातंय ते रखवालदारांच ‘दोनाचे’ ‘वीस’ करण्याचं नवं ‘यंत्र’ आहे हेही कळालं तेही असंच!





{fullwidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال