१२ जानेवारी १८६३. बंगालमध्ये ‘नरेंद्रनाथ दत्त’ नामक व्यक्तीचा जन्म. पुढे हीच व्यक्ती आधुनिक भारतातील सर्वात पुरोगामी योगी, धर्मप्रसारक आणि मार्गदर्शक ‘स्वामी विवेकानंद’ म्हणून उदयास येते. आजच्या घडीला विवेकानंदांनी तरुणाईसाठी केलेले लेखन, संबोधन कधी नव्हे इतके महत्त्वपूर्ण ठरत आहे, ठरणार आहे; पण जर तरुणाईने या अफाट ज्ञानसागराला पत्र लिहायचं ठरवलं तर?
प्रिय नरेन् ,
वयाचा-ज्येष्ठतेचा सनातनी पाचपोच न बाळगता तुला वापरलेलं ‘एकेरी’ संबोधन वाचून तू भुवई उंचावणार नाहीस हे मला माहीत आहे. प्रत्यक्ष परमेश्वराला तरी कोण अहो-जाहो घालतं? आणि तुला आम्हां युवकांच्या लेखी तरी ईश्वराचंच स्थान आहे नरेन्.
हाताची घडी घालून भगव्या वस्त्रांमध्ये किंचित उजवीकडे झुकून उभी तुझी देखणी, रुबाबदार नि करारी मुद्रा डोळ्यांसमोर तरळली तरी माझे हात आदरानं आपोआप जोडले जातात. मात्र तरुण वयात उमलताना तुझ्या एकेक पैलूशी ओळख होऊ लागली नि समजलं – अरे, हा साधू चक्क कुस्ती, लाठीयुध्द, घोडेस्वारीसारखे छंद जोपासत होता? त्याला व्यायामाची नि खेळांची इतकी आस्था होती की, तरुणाईला सरळ फुटबॉल खेळा असा सल्ला द्यायचा? इतकंच नाही, तर वेद, उपनिषदं, रामायण, महाभारत, भगवद्गीता कोळून प्यायलेल्या ह्याला दर्शनशास्त्रापासून ते समाजशास्त्रापर्यंत अनेक विषयांत रुची नि गती होती? आणि मग तू केवळ आमचा ‘स्वामी’ उरला नाहीस, तर ‘स्वामी’ शब्दाच्याही मर्यादा ओलांडत आमचा ‘मितवा’ झालास – मित्र, तत्वज्ञ नि वाटाड्या!
नरेन्, तुला शास्त्रीय संगीताचीही उत्तम जाण होती हे आतापर्यंत माहीतच नव्हतं मला. स्वामी विवेकानंदांनी बेनी गुप्ता नि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर धडे गिरवले, हे अगदी काल-परवा वाचलं बघ. तुझा ‘कर्मयोग’ हा ग्रंथ हाती पडला नि शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेत ‘माय सिस्टर्स अँड ब्रदर्स’ अशा तेजस्वी वाणीतले साक्षात्कारी शब्द उच्चारत परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरवणारा तरुण तपस्वी कसा विचार करतो ते पाहून थक्क झालो!
‘भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्वाचा संन्यासी’ मथळ्याखाली न्यूयॉर्क क्रिटिकनं ‘दैवी वक्तृत्वाचा धनी’ या शब्दांत तुझं वर्णन केलं होतं ना? ‘स्वत:ला कमकुवत समजणं हे सर्वांत मोठं पाप आहे’, ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका’, ‘अनुभव हा सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा’, ‘महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो’, ‘शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या ठायी असते तोच खरा कर्तृत्ववान होय’, ‘स्वत:चा हेतू प्रबळ ठेवा, लोकांना जे बोलायचं ते बोलू द्या – एक दिवस हेच लोक तुमचं गुणगान गातील’, ‘चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई सुरु असते, त्याला कोणीच हरवू शकत नाही’, ‘स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे इतरांना दोष द्यायला तुम्हाला वेळच उरणार नाही’ अशा अगणित विचारमौक्तिकांनी तू माझंच नव्हे, तर माझ्यासारख्या कित्येकांचं मनोधैर्य उंचावलं आहेस. नैराश्याच्या गर्तेत अडकून दरवर्षी जीव देणाऱ्या भारतातल्या लाखो तरुणांनी एकदा तरी तुझं समग्र साहित्य वाचलंच पाहिजे.
कलकत्त्यातल्या सिपलापल्लीमध्ये विश्वनाथ दत्त या उच्च न्यायालयातल्या अॅटर्नीसाहेबांच्या पोटी तू जन्मलास; तेव्हा त्यांनीही मनाशी ठोकताळे बांधले असतीलच, की तू कायदाभास्कर व्हावंस नि त्यांचा वारसा पुढं न्यावास. मात्र मूलत:च उदार नि धार्मिक-सामाजिक संदर्भात पुरोगामी विचारांचे वडील आणि दयाळू, धर्मपरायण नि सेवाभावी आई यांनी कसल्याही अपेक्षांचं ओझं न लादता तुझ्या विचारसरणीला वळण नि संस्कार दिले. म्हणूनच ‘माणसातल्या दिव्यत्वाचं प्रकटीकरण’ हे ध्येय केंद्रस्थानी ठेवून तू संपूर्ण भारतवर्षाची वैचारिक आध्यात्मिक वाट उजळलीस. पोरांना ‘रॅटरेस’मध्ये पिटाळणाऱ्या किती पालकांना आज ह्याचं महत्व समजू शकेल.
‘जब तक आप खुद पर विश्वास नहीं करते, तब तक आप भगवान पर विश्वास नहीं कर सकते।’ हा विचार नि ‘तत् त्वम् असि – ते ब्रम्ह म्हणजे तू स्वत: आहेस, स्वत:तला परमेश्वर आधी शोध’ हा सिध्दान्त तू उलगडून सांगेपर्यंत जुन्या वेदान्त्यांचं अद्वैत नुसतं निवृत्तिप्रवण अन् तात्त्विक चर्चेपुरतंच मर्यादित होतं. १८९२ मध्ये वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी जिथं तीन दिवसांच्या तपसाधनेत तुला जीवनध्येय गवसलं, त्या कन्याकुमारीला मी नुकतीच भेट दिली आणि एकदम तुझ्या तत्वज्ञानामागची प्रचंड ताकद जाणवून भारावून गेलो. तिन्ही सागरांनी वेढलेल्या त्या श्रीपाद शीलेवर बसून स्वत:ला आजवर विराट ब्रम्हांडातला एक यत्कश्चित ठिपका समजणारा मी ‘छोट्याशा अणूतही विश्वाची उलथापालथ करण्याची अपार शक्ती असते’ ह्याची नव्यानं जाणीव होऊन प्रत्येक सचेतन जीवामध्ये जगाचा चेहरामोहरा बदलण्याची अमर्याद ऊर्जा असते यावर विश्वास ठेवायला शिकलो!
सुभाषचंद्र बोस यांनी तुला आधुनिक राष्ट्रीय चळवळीचे आध्यात्मिक पिता मानलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरुंचे सेक्रेटरी एम्. मथाई यांच्यापाशी ‘अलीकडच्या शतकात भारताने निर्माण केलेला सर्वात महान माणूस म्हणजे विवेकानंद’ या शब्दांत तुझा गौरव केला. याचं कारण म्हणजे भारतासकट साऱ्या जगाला धर्माकडे पाहण्याची एक नवी व्यवहारदृष्टीच तू बहाल केलीस. भारतातल्या सामाजिक चळवळींमागे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या तुझीच प्रेरणा होती. आजही राज्याराज्यांत शंकर अभ्यंकर तुझ्या चरित्रांवर कथाकथनाचे कार्यक्रम करतात, तर तुझ्या जीवनावर बेतलेल्या नाटकांद्वारे शुभांगी भडभडेंसारख्या लेखिका १५० प्रयोगांची मजल मारतात. देशभर तुझ्या चरित्रकारांनी ‘राष्ट्रद्रष्टा’, ‘मानवतेचा महापुजारी’, ‘अमृतपुत्र’ या बिरुदांनी तुझा सन्मान केला आहे.
‘शिक्षण म्हणजे मानवातल्या पूर्णत्वाचा आविष्कार; म्हणून विद्यार्थी शाळेत येत नसेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे गेले पाहिजे’ हे तुझं तत्व तर शिक्षण-संशोधनक्षेत्राला आजही तितकंच तंतोतंत लागू पडतं. तरुणांसाठी तू प्रेरणेचा ध्रुवतारा आहेस; म्हणूनच तर तुझा जन्मदिवस हा ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून जल्लोषात साजरा केला जातो.
‘वारंवार देवाचं नाव घेतल्यानं कोणी धार्मिक होत नाही, जी व्यक्ती सत्यकर्म करते ती धार्मिक असते’, ‘मनुष्यसेवा हीच खरी ईश्वरसेवा होय’, ‘जे लोक नशीबावर विश्वास ठेवतात ते भेकड असतात, स्वत:चं भवितव्य स्वत: घडवणारेच लोक खरे कणखर’ अशा भूमिकांतून तू जुनाट अंधश्रध्दा नि अमंगळ जातिभेद यांचा पदोपदी धिक्कार करत आलास. कोणतीही गोष्ट सारासार विचार अन् व्यावहारिक दृष्टिकोनाची मापं लावूनच स्वीकारायचास तू. ‘भक्तियोग म्हणजे खऱ्या, अकृत्रिम भावाने भगवंताचे अनुसंधान’ हे सांगताना धर्माला चिकित्सेची वैज्ञानिक कसोटी लावून तोलून-पारखून घेण्याची आत्यंतिक निकड तू वारंवार मांडलीस. दुर्दैवानं आज तशी विज्ञाननिष्ठा उरलीच नाही!
‘जो अग्नी आपल्याला ऊब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करु शकतो. पण हा अग्नीचा दोष नाही’, या इशाऱ्यातून तू विज्ञानाच्या जिज्ञासू पाठपुराव्यासाठी विवेकाच्या खंबीर अधिष्ठानाची गरज मांडलीस. ‘भुकेल्यांना परमार्थ समजावून सांगणे म्हणजे धर्माची क्रूर चेष्टा आहे’ म्हणत जनतेच्या उध्दारासाठी सदोदित झटण्याचा संदेश दिलास. ‘दरिद्रीनारायण’ हा शब्द तूच जगाला दिलास नि गरिबीच्या उच्चाटनाला परमकर्तव्य मानलंस. ‘पश्चिम ही धनिकांच्या टाचेखाली चेंगरली असली, तर पूर्व ही धर्ममार्तंडांच्या टाचेखाली चिरडली गेली आहे’ असे ताशेरे ओढत ‘जुन्या रुढींचं खोटं समर्थन करण्यापेक्षा तुम्ही नास्तिक झालात तरी चालेल’ हे ठणकावून सांगायलाही कमी केलं नाहीस! अध्यात्माला भौतिकतेची जोड देऊन स्वकीयांनी अधिभौतिकाच्या चिंतेत निष्क्रिय न बसता स्वत:चा उत्कर्ष साधावा, हीच तळमळ होती ना त्यामागे?
निग्रही कर्तव्यपरायणता, अविरत ज्ञानोपासना, मनीचा सच्चा भाव नि कठोर आत्मसंयम या चतु:सूत्रीतून मोक्षप्राप्तीचे ४ योग तू शिकवलेस खरे, पण आज त्या अध्यात्मक्षेत्राची काय अवस्था आहे? गुरमीत राम रहीम सिंग, आसाराम बापू सारख्या गजाआड शिक्षा भोगणाऱ्या बलात्काऱ्यांनी, सत्यसाईबाबासाख्या गडगंज धनदांडग्यांनी, निर्मलबाबासारख्या करचुकवेगिरीच्या खटल्यांत अडकलेल्यांनी नि राधे माँ सारख्या मेकअप-गॉगल चढवून फिरणाऱ्यांनी अध्यात्माची व्याख्याच मलीन केलीय.
जथ्थ्याजथ्थ्यानं दंगलीत निरपराधांना ठेचताना, केवळ मजेखातर प्राणिमात्रांचा लाठ्या-फटाक्यांनी प्राण घेताना, जातिधर्माच्या झापडांखाली प्रेमच करणं विसरताना आम्ही सहिष्णुतेच्या नि वैश्विकतेच्या प्राचीन वैदिक परंपरेवर सरळसरळ थुंकत आहोत! ‘कर्माच्या पाठीशी लपलेला कोणता हेतू आपल्याला कार्यास प्रवृत्त करीत आहे हे आपण हुडकून काढले पाहिजे. ज्या मंगल क्षणी आपण संपूर्ण नि:स्वार्थी होऊ, त्याच क्षणी आपली समस्त शक्ती एकेजागी केंद्रीभूत होईल आणि आपल्यातील अंत:स्थ ज्ञान प्रकाशित होईल’ अशा धारदार ओजस्वी विचारधारेनं आमच्या ओंगळ वास्तवाची लक्तरं फाडायला आज तू हवा आहेस, नरेन्! आज तू फार फार हवा आहेस!
पत्रास कारण की, ‘सखार प्रति’ म्हणजे ‘मित्रास’ ही तुझी बंगाली कविता मध्यंतरी वाचण्यात आली.
बहुरुपे सम्मुखे तोमान छाडि
कोथाय खूंजिछो ईश्वर?
जीवे प्रेम करे जेई जन
सेई जन सेविछे ईश्वर!
त्याचं देवनागरी लिप्यंतरण होतं –
ईश्वर अनेक रुपांनी तुझ्यासमोर उभा ठाकलाय,
ते सोडून ईश्वर शोधतोस कुठे?
जे प्राणिमात्रांवर प्रेम करतात,
तेच ईश्वराची खरी सेवा करतात!
नरेन्, या कवितेतला अर्थ आता फक्त कागदावरच उरलाय रे, तो नव्यानं भारदस्त खणखणीत आवाजात शिकवायला नि आमच्या ‘डीएनए’मध्ये भिनवायला निघून ये कसा!
– तुझ्या चिरप्रतीक्षेत नि तुझ्या विचारांच्या प्रकाशात
धडपडणाऱ्या आजच्या तरुणाईचा एक प्रतिनिधी!
{fullwidth}