जीवनाचे प्रामुख्याने दोन कालखंड पडतात – तू असताना आणि तुझ्या पश्चात!
बहरणाऱ्या झाडाला रेलून
शिरून त्याच्या कुशीत
बसलीस तू नेहमीच लाही
शमावणाऱ्या
सदाबहार सावलीच्या अपेक्षेत
मी मात्र कायमच राहिलो
वठलेल्या झाडासारखा
फुटणारी नवी पालवी लपवत
बरसणाऱ्या पावसात
भिजून
होऊन त्याच्या तालात बेधुंद
नाचलीस तू नेहमीच छोट्या
चातकासारखी
तहान भागवणाऱ्या जीवनाच्या अपेक्षेत
मी मात्र कायमच
बरसलो गरजेपुरता
जमलेला सगळा ओलावा लपवत
वाहणाऱ्या नदीत उतरून
पोहून तिथल्या निर्मळ प्रवाहात
जगलीस
तू नेहमीच निर्भय माशासारखी
प्रवाहात समर्पित होण्याच्या अपेक्षेत
मी
मात्र कायमच दुर्लक्षित बसलो तुला
मनातला अथांग सागर लपवत
पुन्हा
वेगाचीही भीती वाटावी अशा वेगात
मग मी जगत राहिलो हे माझं नसलेलं
जीवन
तेव्हा गाफील असताना काळाने
बदलल्या भूमिका आपल्या क्षणातच
क्षणाक्षणांचा
हिशोब चुकता करण्यासाठी
आता तू झालीस खरंखुरं
पालवीविना वठलेलं
झाड
लांबलेला शुष्क पाऊस
कोरडीठण्ण बोडकी नदी
आणि मी . . .
तू
{fullWidth}
वाह! भावनांच्या बदलत्या भूमिकांचे हे स्थित्यंतर निरंतर असते.प्रेम कधीच आटत नाही. ते फक्त भूमिका बदलते.पात्रांची अदलाबदल करत राहते.कथानकाचा flow वेळीच उमगला नाही तर पात्र बदलतात,कहाणी पुढे जाते अन मागे उरते पश्चातापाची सल. ओलावा वेळीच पाझरला असता तर? पालवी वेळीच बहरली असती तर? सागर तेव्हाच प्रसवला असता तर अन पाऊस वेळीच पडला असता तर? अप्रतिम भावाविष्कार💐
उत्तर द्याहटवाधन्यवाद. 'टाकबोरू'वर आलेली ही पहिलीच समीक्षा.
हटवाया पात्रातून त्या पात्रात प्रवास करतंच प्रेम अभिव्यक्त होत राहतं असा माझा आपला एक कयास आहे. नाहीतर आईच्या पोटातून कोणी प्रेम घेऊन येताना मी तरी पाहिलेला नाही. इथे येऊन इतरांनी आपल्यावर केलेल्या प्रेमातून आपण प्रेम करायला शिकतो. आणि विकृत प्रेमाचं उत्तरही इथेच सापडतं. एखादी व्यक्ती खरोखर विकृत प्रेम करते मात्र त्याच्या दृष्टीने ते विकृत नसणारंच!
बऱ्याच वेळा आपणही प्रेमाचं अस्तित्व जाणण्यात कमी पडतो. अशाच एका माणसाची ही व्यथा आहे.
धन्यवाद 😊