सप्तरंगी नाते

[वाचनकाल : ८ मिनिटे] 
सप्तरंगात रंगलेल्या स्त्रीच्या चेहऱ्याची छटा, clip art of women and his son

मानवी मनांना गुंफणाऱ्या नात्यांचा रंग कोणता? हा प्रश्नच खूप चुकीचा भासतो, नाही? जसा माणसाच्या स्वभावाला कोणता रंग नाही – तसाच नात्यांनाही नाही. आणि जसा मानवी स्वभावाला काळा, पांढरा किंवा मग करडा रंग आहे तसाच नात्यांनाही आहे. प्रत्येक नात्यानिशी हे बदलते! आणि जर स्वभाव सप्तरंगी असेल, मनातील भावना सप्तरंगी असतील तर जोडले गेलेले नाते कोणत्या रंगाचे असेल?
 
“कृष्णा . . . अरे किती पळवशील . . . थांब ना जरा . . . आधी गणवेश बदलून घे, मग पळ . . . ”  गार्गी मुलाच्या मागे पळताना दमून जात म्हणाली.
     कृष्णा जेमतेम पाच वर्षांचा; पण एका ठिकाणी बसेल तर शप्पथ! मागील वर्षापासून शाळेत जायला लागल्यावर तर विचारता सोय नाही. घरभर नुसती पळापळ आणि खेळणी व पुस्तकांचा पसारा. गार्गी पुरती हैराण व्हायची . . . पण तिला मजाही वाटायची आणि समाधानही. कारण, अजूनतरी तिने कृष्णाला मोबाईल पासून हेतूपुरस्सर दूर ठेवत त्याचे बालपण जपले होते.
     गार्गी स्वतः कनिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्राची शिक्षिका होती. त्यामुळे स्वतःचे सर्वकाही सांभाळून कृष्णाकडे लक्ष देणे ही तिची तारेवरची कसरतच होती.
     रोज शाळेतून आल्यावर ‘आज शिक्षकांनी काय काय  शिकविले?’ हे विचारत ती कृष्णाला खाऊपिऊ घालीत असे. नवीन शाळा सुरू झाल्याने तोही सगळ्या गमती हसत-खेळत आईला सांगे.
     आजही खाऊ घालताना गार्गीने विचारले. “आज काय बरं शिकवले आमच्या कृष्णाला शाळेत?”
     कृष्णा आनंदातच म्हणाला, “आई . . . आज ना टिचरने माझ्या एका फ्रेंडला रागावलं.”
     गार्गी हसत म्हणाली, “का रेे बाळा काय केलं त्याने?”
     कृष्णा आईने भरवलेला घास तोंडात घेत म्हणाला, “अगं आई तो म्हणाला, टिचर कृष्णाचं नाव जुनं आहे, माझं नाव तर नवीन आहे!”
     गार्गीने दुसरा घास भरवत विचारलं. “त्याचं काय नाव रे?”
     “आरव . . . ” कृष्णाने सांगितलं. “ . . . मग टीचर त्याला म्हणाल्या, नो आरव . . . बॅड हॅबीट. असं म्हणू नये कोणाला. सगळ्यांचीच नावे छान असतात. कारण, ती मम्मी-पप्पांनी खूप प्रेमाने ठेवलेली असतात.”
     गार्गी त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, “होय बेटा, सगळ्यांचीच नावे छान असतात.”
     कृष्णाने खुर्चीवर बसून पाय हलवत मजेत खात असताना विचारलं. “आई तू माझं नाव कृष्णा का ठेवलं ग?”
     आई हसत म्हणाली, “बेटा कारण ते देवबाप्पाचं नाव आहे . . . आणि तू पण आमचा छोटासा देवबाप्पाच की नाही . . .  म्हणून ठेवलंय!”
     कृष्णा ‘ओऽऽऽ’ म्हणत परत बेडरूमकडे झोपायला पळाला.
     खेळ-खेळ करत कृष्णा झोपला एकदाचा. त्याला पांघरूण घालून अलगद आपला हात सोडवित गार्गी तिथून निघाली . . . कृष्णा एक-दोन तास झोपल्यावर गार्गीला जरा निवांत वेळ मिळत असे. त्याचवेळी ती आपला वाचनाचा छंदही पुरा करत असे. परंतु आज कृष्णाने विचारलेल्या प्रश्नाचे जरी तिने त्याच्या समाधानासाठी उत्तर दिले असले, तरी ‘त्याचे नाव कृष्णा का ठेवलंय’ या मागची हकीकत आठवून आजही गार्गीच्या ओठांवर स्मितहास्य आणि डोळ्यांत पाणी तरळत असे . . . बाहेरच्या टेरेस गार्डनवर उभे राहून गार आल्हाददायक वारा अंगावर येताच गार्गीचे मन आठ वर्षांपूर्वीच्या आठवणीत रमले . . .

लग्नाआधी गार्गी ‘एम.एस. सी.’ झाल्यानंतर एका महाविद्यालयात नोकरीला लागली होती. अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे रसायनशास्त्राचे थेअरी आणि प्रॅक्टीकल्स घेण्याची जबाबदारी मिळाली होती तिला . . . सुरवातीला थोड्या अडचणींचा सामना करावा लागला; पण प्रत्येक वेळी तिला गणिताच्या जोशी मॅडम आणि जीवशास्त्राच्या दाणी मॅडम सांभाळून घेत असत. गार्गी नुकतीच कॉलेज सोडलेली मुलगी तर त्या दोघी फार वरिष्ठ. जोशी मॅडम तर दोन वर्षांनी निवृत्त होणार होत्या; पण गार्गी नवीन होती म्हणून त्यांनी कधीही तिला उच्चपदाचा बडगा दाखवला नव्हता. याउलट गार्गीला ती स्वतः विद्यार्थीनी आणि मॅडम तिच्या गुरू असेच वाटायचे . . .
    मागील वर्षभरात गार्गीला विद्यार्थ्यांना हाताळण्याची बरीच सवय झाली होती. त्यात जोशी मॅडमच्या मार्गदर्शनामुळे ती तरबेजही झाली होती. जोशी मॅडम गणितात कच्च्या असलेल्या विद्यार्थ्यांना जास्त वेळ देऊन त्यांचे वेगळे वर्गही घेत असत. यावर्षीही गणितात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी बोलावून घेतले होते. यावर्षीचे कॉलेज सुरू होऊन आता दोन महिने सरत आले होते. एकदा जोशी मॅडम आणि गार्गी इतर शिक्षकांसमवेत शिक्षककक्षात बसलेली असताना एक पालक परवानगी घेऊन आत आले.
     त्यांना गणिताच्या आणि रसायनशास्त्राच्या मॅडमना भेटायचे होते, म्हणून मग गार्गी आणि जोशी मॅडम बाहेर आल्या.
     ते गृहस्थ हात जोडून म्हणाले, “नमस्कार . . . मी उपाद्धे. माझा मुलगा इथे बारावीला शिकत होता; पण तो मागिल वर्षाप्रमाणे या वर्षीही गणित आणि रसायनशास्त्रातच नापास झालाय.”
     हे ऐकून जोशी मॅडम चेहर्‍यावर आश्चर्य दाखवत म्हणाल्या, “अहो उपाद्धे काय हे? किती हलगर्जीपणा झाला हा? कॉलेज सुरू होऊन दोन महिने झाले आणि तुम्ही आता येताय सांगायला? आता तीन महिन्यांत पूर्वपरीक्षा येईल. आधीच तुमचा मुलगा दोनदा नापास झालाय आणि तरी तुम्ही वेळ घालवताय?”
     हे सर्व ऐकत असलेली गार्गी म्हणाली, “हे बघा सर, मुळात हे दोन्ही विषय इतके कठीण असल्यावर तर इतका उशीर करणे योग्य नाही. जोशी मॅडम अधिक तास घेतात तिथे पाठवा मुलाला उद्यापासून.”
     सगळं निमूटपणे ऐकून घेत उपाद्धे चेहर्‍यावर गंभीर भाव आणत म्हणाले, ”मॅडम बरोबर आहे तुमचं . . . पण एक प्रॉब्लेम झालाय . . . माझ्या मुलाला चार महिन्यापूर्वी ब्लड कॅन्सर डिटेक्ट झालाय. आणि वेळीच लक्षात न आल्याने तो थर्ड स्टेजवर गेलाय. त्यामुळे आता त्याच्याकडे जास्त वेळ शिल्लक नाही!”
     जोशी मॅडम आणि गार्गीला आश्चर्याचा धक्काच बसला. दोघीही डोळे विस्फारून त्यांच्याकडे बघू लागल्या.
     जोशी मॅडम म्हणाल्या, “ओहऽऽऽ माफी असावी . . . आम्हाला खरेच माहिती नव्हते.”
     गार्गीच्या डोळ्यात तर टचकन पाणीच उभे राहिले.
     उपाद्धे स्वतःला सावरत म्हणाले, “मॅडम माझ्या मुलाला, आपल्याला काय झालंय याची कल्पना आहे म्हणूनच त्याला तुम्हाला भेटायची फार इच्छा आहे . . . तुम्ही याल त्याला भेटायला?”
     अगदी हेलावून गेलेल्या जोशी मॅडम आणि गार्गी दोघींनीही होकार दिला आणि उपाध्दे निघून गेले. 
     दुसर्‍या दिवशी सकाळीच त्या दोघी त्यांच्या घरी पोहचल्या. घरातले सगळेच वातावरण अगदी सर्वसामान्य लोकांकडे असते तसेच होते. कोणाला सांगूनही खरे वाटले नसते की ह्या घरातला मुलगा आजाराने ग्रस्त आहे. त्याला भेटताच जोशी मॅडम आणि गार्गीचे मन आतून उचंबळून येत होते परंतु त्याच्या चेहऱ्यावरची निरागसता, त्याचा त्याही परिस्थितीतला आनंदी चेहरा बघून त्या थक्क झाल्या होत्या. 
     तो म्हणाला, “मॅडम हे दोन्ही विषय मला जरा जास्तच कठीण जातायेत. तुम्ही मला परत शिकवाल? मला स्वतःला बारावीत पास झालेलं बघायचंय.”
     त्याचा हा प्रश्न अगदी मन कासावीस करणारा होता — त्या दोघींसाठी.
     जोशी मॅडम चेहर्‍यावर जमेल तितके स्मित आणून म्हणाल्या, “होय बेटा आम्ही शिकवू तुला आणि तू नक्की पास होशील, काळजी करू नकोस.”
     गार्गीला तर बोलायला शब्द सापडत नव्हते.
     त्याच्या आईवडिलांना भेटल्यावर त्यांच्यावर ओढवलेल्या बिकट परिस्थितीची जाणीव झाली होती दोघींना परंतु अशाही स्थितीत अगदी निश्चल राहून मुलाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे असलेले पाहून त्यांना त्यांचा अभिमान वाटत होता. जोशी मॅडमना तर त्यांच्या या लढ्यात आपणही खारीचा वाटा उचलणार आहोत याचेच समाधान वाटत होते. त्यांना ‘रोज तुमच्या मुलाला शिकवायला येणार आणि त्याला पास करून दाखवणार’ हे आश्वासन देऊन त्या दोघी निघाल्या.
     रस्त्याने जाताना गार्गी फारच भावूक झाली होती. ते बघून आयुष्यभर दांडगे अनुभव गाठीशी जोडलेल्या जोशी मॅडम तिला म्हणाल्या, “हे बघ गार्गी आपण शिक्षक ना विद्यार्थ्यांचे दुसरे पालकच असतो मात्र आपल्यावरही त्यांच्या आईवडलांपेक्षा मोठी जबाबदारी असते. कारण, आपण त्यांना सुशिक्षित बनवणार असतो म्हणूनच ती जबाबदारी आपण समर्थपणे पेललीच पाहिजे. तेव्हा आता एकच ध्यास — त्याचा अभ्यास घेऊन त्याला पास करून देणं. त्याच्या सोबत ही आपलीही परीक्षा आहे!”
     मॅडमचे बोलणे ऐकून गार्गीला थोडा धीर आला. “मॅडम तुम्हाला इतक्या वर्षांत साधारण पेपरमधे कुठले महत्त्वाचे प्रश्न येऊ शकतात हे सरावाने माहिती झाले असेल; पण माझे तर जेमतेम शिकवायला लागल्याचे हे दुसरेच वर्ष आहे. नेमके काय महत्वाचे आहे हे कसे ओळखावे आणि सगळा अभ्यासक्रम घेण्याइतपत वेळही नाहीये हातात. समजा माझ्या काही चुकीमुळे तो रसायनशास्त्रात परत नापास झाला तर . . . बापरे कल्पनाही करवत नाही हो मला.”
     गार्गीची समजूत काढत मॅडम म्हणाल्या, “अगं काळजी करू नकोस, मी तुला तुझ्या आधी रसायनशास्त्र शिकविणाऱ्या मॅडमचा नंबर देते. त्या आता निवृत्त झाल्यात मात्र तुला याबाबत नक्कीच मार्गदर्शन करतील. हवं तर त्यांना जाऊन भेट.”
     गार्गीला एकदम धीर आला. ती म्हणाली, “धन्यवाद मॅडम. तुमच्या आणि त्या मॅडमच्या मदतीने मी नक्कीच आपले ध्येय साध्य करीन.”
     गार्गीने संध्याकाळीच त्या मॅडमना फोन करून भेटायला येण्याबाबत विचारले. भेटून त्यांना सगळी हकीकत सांगितली. त्यांनीही संपूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी काही स्वतःच्या नोट्स आणि निवड केलेल्या प्रश्नपत्रिकाही गार्गीला देऊ केल्या. त्यामुळे तिचा उत्साह द्विगुणित झाला. दुसर्‍या दिवशीपासून गार्गीने वाचनालय आणि इंटरनेट पालथे घालून मागील पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका मिळवल्या, त्यातील पुन्हा-पुन्हा विचारले जाणारे प्रश्न लिहून घेतले. आणि मग मॅडमनी दिलेल्या नोट्सची मदत घेऊन स्वतःच्या वेगळ्या अशा सोप्यात सोप्या नोट्स बनवल्या आणि अगदी लढाईवर निघाल्यासारखी शस्त्रास्त्र घेऊन तयार झाली.
     एरवी वर्षभर मुलांना शिकवून शिक्षक आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडतात आणि त्यापुढील कार्य मुलांवर सोडलेले असते; पण या जगावेगळ्या प्रसंगाच्या परीक्षेत तर आधी शिक्षक म्हणून गार्गीचीच परीक्षा होती नंतर विद्यार्थ्याची. पहिल्यांदाच शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही एकाचवेळी परीक्षेला बसणार होते.
     जोशी मॅडम आणि गार्गी आपल्या वेळेनुसार कधी एकेकट्या तर कधी मिळून त्याच्याकडे जाऊ लागल्या. आपले सगळे कौशल्य पणाला लावून कसोशीने त्याचा अभ्यास घेऊ लागल्या. त्याच्याकडून प्रश्नपत्रिका सोडवून घेऊ लागल्या. तोही हसत-खेळत अभ्यास करू लागला. ‘आपण आजारी आहोत आणि काही महिन्यांत या जगातच नसणार आहोत’ हे त्याला विसरायला लावणाऱ्या जोशी मॅडम आणि गार्गी जणूकाही त्या कृष्णाच्या यशोदा बनल्या होत्या! त्याचे आईवडील हे दृश्य बघून अगदी कृतकृत्य झाले होते. अखेर परीक्षेचा दिवस उजाडला . . .
     कृष्णाला व्यवस्थित सगळी काळजी घेऊन परीक्षेला नेण्यात आले. यावेळी का कोणास ठाऊक पण त्यालाही या दोन्ही विषयांच्या पेपरचे दडपण आले नव्हते. मुक्त आणि निर्धास्त मनाने तो परीक्षेला गेला. मॅडम आणि गार्गी स्वतः त्याला बेस्ट लक द्यायला आल्याने तो अतिशय उत्साहात होता. गार्गीने तर चक्क मनातल्या मनात देवाचे नामस्मरणही केले होते. इतकी तर ती स्वतः विद्यार्थीनी होती तेव्हा पेपर लिहितानाही घाबरली नव्हती! पेपर झाले आणि महिन्याभरात निकालही जाहीर झाला . . . शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही उत्तीर्ण झाले!
     जोशी मॅडमना हे काही नवीन नव्हतं; पण गार्गीचा आनंद गगनात मावेनासा होता. आजपर्यंत विद्यार्थीनी म्हणून जसे तिने खणखणीत यश मिळविले होते तसेच आज शिक्षक म्हणूनही मिळाल्याचा आनंद अवर्णनीय होता. जोशी मॅडम आणि गार्गी दोघीही कृष्णाला भेटायला गेल्या. तो त्यांची वाटच पहात होता, त्या दिसल्याबरोबर जमेल तसे धडपडत का होईना, अंथरूणातून ऊठून त्यांना नमस्कार करायला वाकला.
     मॅडम आणि गार्गीने मधेच त्याला धरून घट्ट छातीशी कवटाळले . . . ओठ निःशब्द होते आणि डोळ्यांतून अश्रूधारा वाहत होत्या! हे दृश्य अपूर्वाईने बघणारे आईबाबाही आनंदाश्रू गाळत कुतूहलाने बघत उभे राहिले होते. त्यांच्या डोक्यात एकच विचार होता ‘खरंच काय नाते असेल बरं आपल्या मुलाशी यांचे?’

     नक्कीच गुरु शिष्याच्या शिकवणीचे,
     आई मुलाच्या ममतेचे,
     भाऊ बहिणीच्या मायेचे, 
     प्रेमाचे, विश्वासाचे, सहनशीलतेचे, आदराचे
     सप्तरंगात रंगलेल्या या सर्व भावनांचेच! 

मॅडम आणि गार्गी जायला निघाल्या तेव्हा त्यांना दारापर्यंत सोडायला आलेल्या कृष्णाचे आईवडील म्हणाले, “खूप धन्यवाद मॅडम तुम्हाला दोघींनाही, तुम्ही आमच्या मुलाची शेवटची इच्छा पूर्ण केलीत. आता आमचा मुलगा सुखाने जाऊ शकेल . . . ” 
     काळीज पिळवटून काढणारे शब्द होते तेे . . . सगळ्यांचेच डोळे पाणावले, अंतःकरण जड झाले आणि तोंडातून शब्दही न काढता सगळ्यांनीच मनोमन प्रार्थना केली. ‘देवा . . . अरे कुठंयस तू? काहीतरी चमत्कार दाखव आणि आमच्या कृष्णाला वाचव.’
     पण असे सांगून जर देवाने ऐकले असते तर आणखी काय हवे होते? जीवन-मरण आपल्या स्वतःच्याच हातात धरून ठेवलेय त्याने म्हणूनच आपण देवाला मानत असतो.
     दोन महिन्यात कृष्णाची प्राणज्योत मालवली . . . त्याला ओळखणारा प्रत्येक जण हळहळला. कृष्णा जाताना चेहर्‍यावर स्मितहास्यच घेऊन गेला. कारण, तो बारावीत पास झाला होता.
     गार्गीच्या कारकिर्दीच्या सुरवातीलाच तिला एका शिक्षकाच्या आद्यकर्तव्याची जाणिव करून देणारा दांडगा अनुभव मिळाला होता. ती कृष्णाला कधीच विसरू शकली नाही आणि आजन्म विसरणारही नाही, म्हणूनच तिला स्वतःचा मुलगा झाल्यावर तिने त्याचे नाव ‘कृष्णा’ ठेवले.

कृष्णाचे इवलेसे हात जेव्हा मागून तिची ओढणी ओढू लागले तेव्हा गार्गीच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. त्या कडूगोड आठवणींच्या प्रदेशातून भानावर आली. आणि तिने तिच्या कृष्णाला ”ऊठलास बाळ?” म्हणत घट्ट छातीशी कवटाळून घेतले.


• संदर्भ :

• वाचत रहा :
१) भेटी लागी जीवा (दीर्घकथा)
२) प्रतिबिंब (लघुकथा)
३) झुंजार ती (लेखमाला)

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال