स्त्रियांचे आरोग्य हे केवळ गरोदरपणा व बाळंतपण एवढ्यापुरतेच मर्यादित नसून एकंदरीत शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुदृढ व संतुलित असणे देखील महत्त्वाचे असते. या दृष्टीनेच एक छोटे पाऊल उचण्यासाठी, ‘स्त्रीस्वास्थ्य’ ही आरोग्य विषयक लेखमाला प्रस्तुत करतेय. यात नवनवीन विषयांवर स्त्रियांच्या समस्यांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न असेल.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्या महिला आपल्या आरोग्याकडे मात्र तेवढे लक्ष देत नाहीत. स्त्रियांचे आरोग्य हे केवळ गरोदरपणा व बाळंतपण एवढ्यापुरतेच मर्यादित नसून एकंदरीत शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुदृढ व संतुलित असणे देखील महत्त्वाचे असते.
महिलांच्या अनेक समस्या असतात. बरेचदा आपण समस्याग्रस्त आहोत हे त्यांच्या स्वतःच्याच लक्षात येत नाही. याचा अर्थ स्त्री समस्यांविषयी हवी तेवढी जनजागृती केली जात नाही, त्यामुळे काही त्रास होतही असेल तर त्या दुर्लक्ष करतात आणि अंगावर काढतात. पुढे जेव्हा त्रास वाढतो, तेव्हा समस्या जटील होऊन वेळ निघून गेलेली असते.
स्त्रियांचे मानसिक स्वास्थ्य, मासिक पाळीच्या तक्रारी, संप्रेरक (हाॅर्मोनल) असंतुलन, स्तन व गर्भाशयाचा कर्करोग, जननसंस्थेचे आजार, रजोनिवृत्तीच्या वेळी होणारा त्रास या व अशा इतर समस्यांच्या बाबतीत योग्य वैद्यकीय माहिती पुरवली जावी, आरोग्य विषयक उपक्रम राबविले जावेत जेणेकरून स्वतः महिलांना जास्तीत जास्त समस्या कळतील व वेळीच सावध होता येईल.
या दृष्टीनेच एक छोटे पाऊल उचण्यासाठी, ‘स्त्रीस्वास्थ्य’ ही आरोग्य विषयक लेखमाला प्रस्तुत करतेय. यात नवनवीन विषयांवर स्त्रियांच्या समस्यांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न असेल.
सदर माहिती ही, माझे वडील [फिजीशियन, MBBS MD(Medicine)], मामी [स्त्रीरोगतज्ज्ञ, MBBS MD( Gynecology) व आमच्या कौटुंबिक डॉक्टर मॅम [MBBS MS (Obstetrics and Gynecology, Child health) यांनी दिलेल्या वैद्यकीय पुस्तकांवर आधारित असेल.
रोग होणे आपल्या हातात नाही परंतु सावधगिरी बाळगणे हे आपल्या हाती निश्चित असते.
वाचत रहा, सजग रहा, स्वस्थ रहा. धन्यवाद.
महिलांमधील संप्रेरक बदल (Hormonal changes) भाग – १
संप्रेरके (Hormones) म्हणजे काय?
संप्रेरके ही शरीरातील विविध कार्ये पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या ग्रंथींद्वारे (Glands) स्त्रवलेली रसायनं आहेत. आपल्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रंथी असतात. त्यांचे दोन प्रकार आहेत.
पहिला प्रकार म्हणजे तयार होणारा रासायनिक रस नळीवाटे आणून सोडणाऱ्या ग्रंथी. जसे की यकृत (Liver), स्वादुपिंड (Pancreas), लाळ ग्रंथी (Salivary glands).
दुसरा प्रकार म्हणजे, नळी नसलेल्या ग्रंथी. त्यांचा रासायनिक रस सरळ रक्तात मिसळतो. या ग्रंथीतून किती रस पाझरावा याचे नियंत्रण शरीरातील रासायनिक प्रक्रिया (Chemical reactions) आणि चेतासंस्था (Nervous system ) यांच्या आदेशावर अवलंबून असते. या दुसऱ्या प्रकारच्या ग्रंथीमुळे तयार होणार्या रसांना 'संप्रेरके' (hormones) असे म्हणतात. अशी पन्नासहुन जास्त संप्रेरके रक्तामधे सोडली जातात. उदाहरणार्थ गलग्रंथी (Thyroid gland) यांतील संप्रेरकांमुळे शरीराच्या रासायनिक क्रियांचे नियंत्रण होते. ‘पिट्युटरी’ (Pituitary gland) या मेंदूखाली असलेल्या मुख्य ग्रंथीतून तयार होणार्या संप्रेरकांमुळे शरीराची वाढ होते, इत्यादी. मात्र स्त्री व पुरूष यांसाठीची लैंगिक संप्रेरके वेगळी असतात.
महिलांच्या अंडाशयातून (Ovaries) बाहेर पडणारे ‘इस्ट्रोजेन’ (Estrogen) व ‘प्रोजेस्टीरोन’ (Progesterone) ही स्त्री लैंगिक संप्रेरके मासिक पाळी नियमित करण्यासाठी व गर्भधारणा टिकवून ठेवण्यासाठी जबाबदार असतात (याशिवाय गर्भसंप्रेरक व दुधसंप्रेरक हे गर्भधारणेच्या व स्तनपानाच्या काळात काम करतात. इतरवेळी ते तयार होत नाहीत).
ह्या संप्रेरकांची एक विशिष्ट पातळी (Value) असते. त्यांची ही पातळी वयानुसार बदलत असली, तरी त्यात लक्षणीय चढउतार, असंतुलन (Hormonal imbalance) झाल्यास ते काळजीचे कारण बनते. अशावेळी वैद्यकीय मदत घेऊन औषधे, आहार व व्यायाम ह्यांची सांगड घालून ही पातळी नियंत्रित केली जाऊ शकते.
संप्रेरक बदल/असंतुलन (Hormonal imbalance) झालेले कसे कळते?
महिलांच्या जीवनात त्यांना प्रत्येक टप्प्यावर संप्रेरकांच्या बदलांना सामोरे जावेच लागते, कारण पौगंडावस्था, मासिक पाळी, गर्भधारणा व रजोनिवृत्ती अशा अनेक अवस्थांमुळे दरवेळी शरीरात वेगळे बदल होत असतात. संप्रेरकांच्या असंतुलनाची कारणे व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असू शकतील. तरीही सर्वसामान्यतः खालील काही लक्षणे दिसत असतील तर आपल्या शरीरातील संप्रेरकांत असंतुलीत बदल होताहेत असे समजावे.
- स्वभावाच्या लहरी
- गरम वाफा
- भूक न लागणे, झोप न लागणे
- अचानक वजन कमी किंवा जास्त होणे
- अनियमित मासिक पाळी
- लैंगिक इच्छा कमी होणे, वंध्यत्व
- योनी कोरडेपणा
- त्वचेचा कोरडेपणा, केस गळती
- चेहर्यावर अतिरिक्त केस वाढणे, तारूण्यपिटीका
- कमकुवत हाडे, सांध्यांमधे वेदना
यापैकी काही गोष्टी आढळल्यास थोडे दिवस काळजीपूर्वक शरीराकडे सुक्ष्म लक्ष ठेवून असावे. सातत्याने असे घडत असल्यास दुर्लक्ष न करता वैद्यकीय मदत घ्यावी.
संप्रेरक असंतुलनाची कारणे
सामान्यतः बहुतेक स्रिया ४५ ते ५० या वयात रजोनिर्वृत्ती (Menapose) प्राप्त करतात. यावेळी अंडाशय (Ovary) आपले दर महिन्याला अंडकोश सोडण्याचे काम (Ovulation) थांबवते आणि लैंगिक संप्रेरके तयार करणे कमी करते. याच्या परिणामस्वरूप संप्रेरकांचे असंतुलन होत जाते. मासिक पाळी अनियमित होऊन बंद होऊ लागते. या सगळ्याचा ताण देखील शरीरावर जाणवतो आणि त्याद्वारेही असंतुलनात भर पडते. गर्भधारणेत बाळाच्या संरक्षण व पोषणासाठी प्रचंड प्रमाणात ‘इस्ट्रोजेन’ व ‘प्रोजेस्टीरोन’ स्त्रवल्याने प्रसुतीनंतर या संप्रेरकांचे असंतुलन होते. याशिवाय ‘थायराॅईड’चे विकार व ‘पाॅलिसिस्टीक ओव्हरीयन सिंड्रोम’ (PCOD) यामुळेही मोठ्या प्रमाणावर संप्रेरकांचे असंतुलन होते (या दोन्ही विषयांवर स्वतंत्र लेख ‘भाग-२’ मध्ये येईल).
संप्रेरकांचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी योग्य आहारासोबत व्यायामाची जोड देणे देखील आवश्यक आहे. आहारात साखर व मीठाचे प्रमाण कमी करून सेंद्रिय धान्ये, फळे, पालेभाज्या, ‘विटामिन-बी कॉम्प्लॅक्स सप्लीमेंट्स’ ह्यांचा समावेश करावा. आपल्या जीवनशैलीत दररोज, निदान अर्धा तास तरी, चालणे व प्राणायाम अंतर्भूत करावे. पुरेशी झोप घेऊन सकाळी लवकर उठणे, ताण-तणावापासून दूर राहून सकारात्मकतेने जगणे महत्वाचे आहे. या व्यतिरिक्त चाळीशीनंतर नियमित आरोग्य तपासणी करून घेणे उपयुक्त ठरते.
प्रस्तुत लेखमालेत पुढे येणाऱ्या सर्व लेखांतील माहितीचे संदर्भ :
- Diseases of women (Medical and surgical gynecology) : Charles Alfred Lee Reed.
- About my uterus : Abby Norman
- Unwell woman : Elinor Cleghorn
- She-o logy : Sherry. A. Ross
- विकासपिडिया
- पुणे महानगरपालिका
- हेल्थमराठी
{fullWidth}