नमस्कार मी रंगारी!


young artist joyfully painting wall lively cartoon
Your Image Caption

जे काम आपल्याला सर्वात चांगलं जमतं ती आपली कला. आणि जे करताना आपल्याला सर्वात जास्त आनंद मिळतो तो आपला छंद. खास बालमित्रांनी नवनवीन छंद तयार करावेत व त्यातून आपली अशी एक स्वतंत्र कला निर्माण करावी.


नमस्कार माझ्या लहान पाहुण्या! होय तू या संकेतस्थळावरचा छोटा पाहुणाचं आहेस. संकेतस्थळ म्हणजे ‘वेबसाईट’ बरं का. ज्या ‘टाकबोरू’ नावाच्या संकेतस्थळावर तू सध्या आहेस त्यावरील तू पाहुणा. तुझ्यासाठीच आम्ही हा खास ‘बालचमुंचा विभाग’ बनवला आहे.

तो तुला आवडला की नाही हे आम्ही ताबडतोब विचारू शकतो बरं का; पण आम्ही तसं करणार नाही. का म्हणून विचारतोस? कारण, अजून संकेतस्थळ आवडलं की नाही हे ठरवण्यासाठी आम्ही तुला काही वाचायला दिलेलेच नाहीये!

तर या गडबडीत एक गोष्ट सांगायचीच राहिली, नमस्कार मी रंगारी. तू आता विचार करत असशील की ‘रंगारी’ म्हणजे काय? तर रंगारी म्हणजे ‘पेंटर’. इथंही गंमत आहे कशी ते पहा बरं का . . .

चित्रकाराला इंग्रजीत काय म्हणतात? पेंटर. बरोबर. आणि मग पेंटर म्हणजे रंगारी व चित्रकार दोन्ही! असं कसं असणार? तर तसं नाहीये. रंगारी हा शब्द आपल्या सुंदर मराठी भाषेतील काही ठराविक शब्दांपैकी एक आहे ज्याला इंग्रजीत बरोबर अर्थाचा जुळणारा असा शब्दच नाहीये! आहे की नाही गंमत?

रंगारी म्हणजे काय? जो तुझी शाळा, किंवा घर किंवा कोणत्याही भिंती रंगवण्याचे काम करतो तो असतो रंगारी.

तर मी रंगारी; पण मी घरे रंगवत नाही. खरं सांगू का तुला? मी काहीच रंगवत नाही. ही तर वेगळीच अडचण! रंग देत नाही तरी स्वतःचं नाव रंगारी कसं सांगतो? आणि लिहितो म्हणजे हा लेखक असला पाहिजे. कारण, जो लिहितो तो लेखक.

माझ्या मित्रा तुला सांगतो की मला चित्र काढण्याची आवड होती; पण ती कला मला कधी जमलीच नाही. मला काय जमलं? लिहायला जमलं. आता बघ मी माझ्या लिखाणातून वेगवेगळी चित्रं रंगवतो. तू म्हणशील की लेखनातून चित्र कसं रंगेल? रंगारी काहीतरीच सांगतो. हीच तर जादू आहे.

मी तुला विचारेन ‘कला म्हणजे काय? तू कला कशाला म्हणशील?’ ते मला आधी सांग . . . हो तुझी व्याख्या अगदी बरोबर आहे. आता मी तुला माझी कलेची व्याख्या सांगतो.

जे काम आपल्याला सर्वात चांगलं जमतं ती आपली कला. आणि जे करताना आपल्याला सर्वात जास्त आनंद मिळतो तो आपला छंद. छंद जर जोपासला तर त्याची कला होते.

तुला इतकं अवघड न सांगता मी सोपं सांगतो. म्हणजे बघ बरं का एखादा नाचण्याची कला असणारा नृत्यकार काय म्हणतो की ‘मी माझ्या नाचातून उत्तम अभिनय केला’ किंवा मग एखादा चित्रकार काय म्हणतो की ‘मी माझ्या चित्रातून कथा सांगितली आहे’ किंवा बघ एखादा वादक म्हणतो ‘आज मी वाद्यातून गायलो’ भाषण देणारा वक्ता म्हणतो की ‘मी भाषण करताना ऐकणाऱ्यांच्या डोळ्यांसमोर चित्र उभं राहीलं’!

ही तर जादू आहे. कोणताही कलाकार त्याच्या कोणत्याही कलेचं रूपांतर दुसऱ्या कलेत करू शकतो. कला अशी एक कधी नसतेच. तुझीही काहीतरी सुंदर कला नक्कीच असेल.

तसाच मी लेखनातून चित्र उभारणारा रंगारी. लक्षात आलं का? तर तुझ्यासाठी मी आता रंजक माहिती, लहान सुंदर कथा, जगातील रहस्यमयी गोष्टी, विज्ञानाचे सोपे प्रयोग आणि इतर भरपूर काही अवांतर वाचनासाठी घेऊन येणार आहे.


मी तुझ्यासाठी पहिल्यांदाच लिहीत असल्याने मला तुझ्याशी उत्तम बोलता येणार नाही. तरी तू मला समजून घेशील व या बालचमुंच्या विभागाला वाचनासाठी भेट देत राहशील. हो ना?

चल तर पुन्हा भेटू.





{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال