वेळीच घातलेला एक टाका पुढचे नऊ वाचवतो! मग ‘वेळ’ ओळखून घातलेला पहिल्या टाक्याला ‘दूरदृष्टी’ म्हणून नये तर काय? आणि अनोळखी दूरदृष्टी ठेवणाऱ्यास ‘द्रष्टा’ म्हणू नये काय? अशाच एका ‘द्रष्ट्या’वर ही नाट्यछटा.
इकडून कुठून आज? दवाखान्यातून? का म्हणून हो — अरेरे! वाईट झाले . . . तरी मी मागील वेळी म्हणतच होतो तुम्हाला कि गुंतवणूक करा म्हणून . . . त्यावेळी ही गुंतवणूक केली असती तर आजचा हा दिवस आला नसता! — कसली गुंतवणूक? तुम्ही तर अगदीच हे आहात! . . . थांबा सांगतो हो, असे रस्त्यावर मध्येच कुठे? जरा बाजूला या इकडे . . . काय? बाजूला कशाला? अहो चला हो, या गुंतवणुकीची माहिती इतरांना कळायला नको! तुम्ही आपले आहात म्हणून मी आपला बोलतोय तुम्हाला, नाहीतर असे कशाला बोलेन कोणालाही? . . . हांं इथे-इथे कोणी नाही. या बसूयात. — आता खरंखरं सांगा, तुम्हाला ती गुंतवणूक माहीत नव्हती? . . . म्हणूनच हो! म्हणून तर तुमचे हे नुकसान तुम्ही तुमच्या अज्ञानाने ओढावून घेतलेत — तरी मी सांगत होतो, अहो ऐका माझं आणि करून टाका गुंतवणूक; पण नको म्हणालात त्यावेळी! आता तुम्हीच हिशोब जुळवा . . . गुंतवणूक तीस हजारांची, किती? फक्त ती-स ह-जा-र! पण पुढच्या भविष्यातील तीनेक लाख वाचवते ना! तीनेक लाख तर कशाचे कमीत कमी वीस लाख तरी कुठे गेले नाहीत! — महागाईच्या जमान्यात दहा लाख रुपये तरी वाचतात का हो? मी तर वीस लाख रुपयांचे बोलतोय — तेही फक्त आज केलेल्या तीस हजाराच्या गुंतवणुकीमुळे! . . . नाही, नाही या गुंतवणूकीला फसवणूक समजण्याची भूल करू नका तुम्ही. — एकदा पस्तावून सुद्धा पुन्हा अविश्वास दाखवता? अहो खात्री कशाची म्हणून विचारता? मी स्वतः केली ही गुंतवणूक! तीही एक-दोनदा नाही तब्बल तीन वेळा! — होऽऽऽ तीन वेळा! नाहीतर काय उगाच कोण वागवेल हे साठ लाखांचं ओझं? — कुठे करायची गुंतवणूक? तेच तर सांगायला तुम्हाला इकडे कोपऱ्यात घेऊन आलोय! आत्ताचं सोडा हो तुम्ही . . . पण पुढे वेळ आलीच कधी तर बेलाशक या सुविधेचा फायदा करून घ्या. तुमचे भविष्यातील वीस लाख तर आज बुडालेच म्हणा मात्र दुसऱ्या कोणाचेे तुम्हाला वाचवता आले तर पहा — म्हणजे?! म्हणजे अत्यंत विश्वासू माणसांना या गुंतवणूकीबद्दल बोला! जसे मी तुम्हाला बोललो तसे . . . एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ! पण विश्वासू माणसांकडेच बोला फक्त नाहीतर सगळेच मुसळ केरात! — त्या माणसाचा, समोरच्या पार्टीचा, काय विश्वास? अहो साक्षात देवमाणूस समजा! अशी जोखीम उचलून कोण करून देईल हे काम या काळात? बघा विचार करा तीस हजार की वीस लाख? — गुंतवणूकीचं ते ठिकाण कुठे आहे म्हणता? तुम्हाला विश्वास बसणार नाही इतक्या जवळ आहे. काखेत कळसा नि गावाला वळसा म्हणतात ना — तस्सं! आपल्या कार्यालयाच्या मागच्या इमारतीतच आहे हे एकमेवाद्वितीय — सोनोग्राफी सेंटर! तिथे जाताना माझी ओळख सोबत घेऊन जा. उगाच ते कोणालाही उभे करीत नाहीत. ‘गुंतवणूक करायची आहे’, इतकेच बोला फक्त आणि त्यांना माझे नाव सांगा . . . पुढच्या वेळी काही जोखीम घेऊ नका म्हणलं . . . काय म्हणतोय मी?
{fullWidth}