इतस्ततः


mystical old hard cover book glazing in sunlight
आपल्याकडे ऐच्छिक सेवा पुरवणारे ‘मानद समीक्षक’ उपलब्ध होते, अजूनही आहेत. पण टीकाकार तितकेसे नाहीत, जे आहेत ते बेगडी भाषेचे गुलाम.

साहित्य ज्या बेगडी भाषेत रचलं गेलं त्यातच पुन्हा त्याची समीक्षा घडत गेली. एखाद्याला ठराविक पुस्तक स्वर्ग वाटू शकतं तेच पुस्तक दुसऱ्याला भिकार वाटू शकतं. लेखक कधीच एक पुस्तक लिहीत नसतो. ते पुस्तक जितके जण वाचतात तितकी पुस्तके त्यांने लिहिलेली असतात. हरेक जण ते पुस्तक त्याच्या स्वतःच्या पद्धतीने वाचतो, पाहतो, आकलित करून घेतो.


आजकालपासून – किंवा असं म्हणता येईल की कालपरवापासून – सामाजिक स्थितीमुळे आपल्या वैयक्तिक जीवनातील कोणत्याही कृतीत बेगडीपणा घुसून जणूकाही मुरून बसलाय. हा बेगडीपणा हल्ली इतका सामान्य झालाय की कोणी ‘सामान्य’ वागला तर तोच इतरांना ‘बेगडी’ वाटायचा! इतरांना सामान्य वागणं वेगळेपणाचं वाटेल की नाही ते मला निश्चित सांगता यायचं नाही; पण सामान्य वागण्याला ‘मागास’ समजण्याची नवीन रीत निर्माण झाली आहे. हा सुद्धा आपल्या सामाजिक व्यवस्थेचा दुष्परिणाम आहे, असे ना का! आपण पुन्हा बेगडीपणाकडे वळूयात.

खोटेनाटे आभास उभे करून इथं सगळेच आता कोणत्यातरी अनोळखी भासमान व्यक्तीला कसलातरी व कशाचातरी मोठेपणा दाखवण्यासाठी शिवशिवलेले सापडतात. आपल्या जगण्यातला हा दांभिकपणा भाषेत शिरला नसता तर नवलच. मी अलंकारिकता व शब्दप्रचुरता (म्हणजे अनाकलनीय शब्द लेखनात घुसडणे. उदाहरणार्थ, शब्दप्रचुरता!) यांनी भाषेच्या सौंदर्याचे केलेले – व कधीच भरून न निघणारे – नुकसान या विषयावर ‘लंब्याचौड्या’ दिल्या तर मूळ विषय भरकटण्याची भीती जास्त आहे. पाल्हाळ हा सुद्धा भाषेच्या बेगडीपणातील आणखी एक रोगच आहे.

ही बेगडी, खोटी कादंबरीची कपोलकल्पित, बनावट भाषा कायमच ठराविक वर्गाला (म्हणजे स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणाऱ्या प्रत्येकाला. नाहीतर ‘ठराविक वर्ग’ म्हणताच अनेकांचा गैरसमज एक तर ‘इस्लामी’ होतो किंवा ‘ब्राह्मण’ तसं काही इथं अभिप्रेत नाही) रिझवत आलेली आहे. परिणामी नवेनवे लेखक लेखनातील नव्या(?) प्रयोगातही भाषेला आणखी बेगडी बनवत गेले व साहित्यक्षेत्रास बनावटपणाचा शिक्का बसत गेला. त्यासोबत असलं काहीतरी ‘अभूतपूर्व’ इत्यादी भाषेत लिहिणारा लेखक थोर किंवा मग तो परग्रहावरून आलेला असावा असले समज बळावत गेले. थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून भाषेच्या वास्तवी रूपावर यदाकदाचित चुकूनमाकून कोणी बोलायचं म्हणलं तर दलित साहित्याचा संदर्भ निघतो आणि दलित साहित्य विरूद्ध प्रस्थापित साहित्य असा संघर्ष सुरू होतो. त्याच्याशी आपणाला तूर्तास तरी काही देणेघेणे नसावे.

साहित्य ज्या बेगडी भाषेत रचलं गेलं त्यातच पुन्हा त्याची समीक्षा घडत गेली. आपल्याकडे ऐच्छिक सेवा पुरवणारे ‘मानद समीक्षक’ सुद्धा उपलब्ध होते, अजूनही आहेत; पण टीकाकार तितकेसे नाहीत (जो व्यक्ती भाषिक बेगडीपणा मोडू पाहतो त्यावर टीका करणारे पुन्हा ऐच्छिक व मानद सेवा पुरवतातच हा भाग अलाहिदा)‌. जे कोणी आहेत तेही बेगडी जड भाषेचे गुलाम. अशामुळे ‘समीक्षा किंवा टीका वाचून कोणत्याच पुस्तकाबद्दल पूर्वग्रह तयार करू न घेणे’ यावर मी ठाम आहे. हे मी फार उशिरा शिकलो.

काही ठिकाणी दगडी भाषेत संवेदनशील पुस्तकांची समीक्षा, काही ठिकाणी पुळचट भाषेत युगप्रवर्तक साहित्याची समीक्षा, काही ठिकाणी दलित साहित्य न झोपणाऱ्यांची उगाच ‘हवेत गोळीबार’ टीका, कुठे शिव्यांच्या भाषाशैलीस अश्लील ठरवून प्रचारकी विरोध, तर कुठे ‘आपल्या’ गोटातील लेखकाला पाठिंबा दर्शवणारे लेख, प्रस्तावना वगैरे भाषेत चिक्कार घुसले. याला माझी तक्रार नाही; पण यातही भाषेच्या मानेवरून बेगडीपणाचे जू उतरवले गेले नाहीत याची मला खंत वाटते.

वास्तविक पाहता माणूस पुस्तक परीक्षणं, समीक्षणं किंवा टीकालेख का लिहितो? आपण प्रस्तुत ‘काहीतरी व कितीतरी’ वाचलेलं आहे हे दाखवण्यासाठीच! हे माहिती असतानाही मग मी पुस्तकांवर लिहिण्याचं का ठरवलं? अर्थातच त्यामागे वरील काही कारणे आहेत; पण त्यापलीकडे जाऊन मला ते पुस्तक खरोखरच कसं भासलं, कसं जाणवलं हे सामान्य, रोजच्या जगण्यातील भाषेत कुठेतरी नमूद करायचं आहे. त्याला मी परीक्षण किंवा समीक्षण किंवा टीका यांपैकी काहीच म्हणू शकत नाही, कारण यांच्या ठरलेल्या साचेबद्ध (दांभिक) भाषेत मला ते लिहायचं नाही. किंवा मग रकान्यातील शब्दमर्यादा मापून बळंच तोकडं किंवा दीर्घही लिहायचं नाही. जितकं मनात आहे, जसं आहे, तसं कागदावर आणायचं आहे. चांगलं ते चांगलं, वाईट ते वाईट. म्हणून मग मी त्याला ‘इतस्तत:’ म्हणणार. पुस्तकाचं नाव आणि पुढे ‘इतस्तत:’ प्रत्यय लागला की समजायचं मी ते पुस्तक वाचलेलं आहे व त्याविषयी वाटलेल्या चार – किंवा जास्तच – ओळी लिहीलेल्या आहेत. हा शब्द सहज सुचला म्हणून वापरण्याचं ठरवलं.

कोणतंच पुस्तक हे ठरवून टीका करण्यासाठी वाचायचं नसतं. सिनेमा, संगीत व इतर कलांचाही असंच आहे. जेव्हा आपण टीका करायचं म्हणून वाचतो, पाहतो, निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला फक्त स्वतःला ‘खटकणारं’च सगळं सापडत जातं. मानवी स्वभाव तसा आहे. त्याला आपण अपवाद नाही (निदान मी तरी नाही, तुमचं सांगता येत नाही!) आणि अगदी याउलट आपण एखाद्या पुस्तकावर प्रचारकी लेख लिहायचा ठरवून ते वाचतो तेव्हा त्यातील सकारात्मकतेची ‘हिरवळ’च आपल्याला दिसत राहते. एकंदरीत माणसाने कसं मनमोकळेपणाने वाचावं, दिलखुलास चिंतन करत बसावं व नंतर न खटकलेल्या गोष्टींवर बोट ठेवावं, पटलेल्यांवर बोलावं. हे अधिक मजेदार आहे.

कोणत्याच वाईट पुस्तकात सर्वकाही वाईट नसतं आणि फक्त चांगल्या पुस्तकांवर लिहायचं हा नियम नसतो. प्रत्येक पुस्तकात मी कमीतकमी एक तरी चांगली गोष्ट शोधून त्यावर लिहीन (आता कोणी मला या मुद्द्यावर कोण्या ‘श्री श्री श्री गुरुजींचे भक्ताने लिहीलेलं आत्मचरित्रा’दी ग्रंथ पाठवू नयेत ही विनंती). तसेच ते पुस्तक किती भंकस, भडंग व बकवास वाटलं हेही लिहीन (इथंही वर नमुद केलेलले ग्रंथ पाठवू नयेत – सत्य सर्वार्थ नावडो). उद्देश फक्त एकच – मला त्या पुस्तकाबद्दल जे जे वाटलं ते ते शब्दांत मांडणं.

लेखक कधीच एक पुस्तक लिहीत नसतो. ते पुस्तक जितके जण वाचतात तितकी पुस्तके त्याने लिहिलेली असतात. हरेक जण ते पुस्तक त्याच्या स्वतःच्या पद्धतीने वाचतो, पाहतो, आकलित करून घेतो. एखाद्याला ठराविक पुस्तक स्वर्ग वाटू शकतं तेच पुस्तक दुसऱ्याला भिकार वाटू शकतं. हे सांगण्याचा मूळ उद्देश हा की मी लिहिलेलं ‘इतस्ततः’ वाचून कोणत्याही वाचकाने प्रस्तुत पुस्तकावर मत बनवू नये. जमल्यास, व महत्त्वाचं म्हणजे परवडत असल्यास, वाचनालयात मिळत असल्यास सरळ ते पुस्तक वाचून हातावेगळं करावं. शक्यतो मी ज्या पुस्तकांवर लिहीत नाही त्यांसाठीही हाच नियम लागू करावा. मी असंच करतो. परीक्षणातील पुस्तक उपलब्ध झाल्यास, परवडल्यास मी ते वाचतो (पुस्तकांसाठी कधीकधी मैत्रिणीकडे पैसेही मागतो हे इथे सांगणे न लागे).

मी आजपर्यंत जास्त वाचलेलं नाही; पण काही उत्तम पुस्तकं जरूर वाचलीत. नाहीतर इतकं लिहिण्याची बुद्धी मला कुठून निपजली असती? ही लेखनक्षमता त्यांचच देणं आहे. त्या सर्व पुस्तकांवर माझ्याच्याने काही लिहीणं होणार नाही. कारण, मला प्रचंड आळस आहे. पुस्तक वाचनं सोपं, त्यावर लिहिणं अवघड. त्यासाठी पुस्तकाचा ‘अभ्यास’ करावा लागतो, पुस्तक खानाखूणांनी घाण करावं लागतं, मला हे पसंद नव्हतं. परत दोन्ही नियमात मी थोडे बदल केले. एक तर पुस्तकाचा अभ्यास करायचा नसतो ते जाणून घ्यायचं असतं आणि जो मुद्दा महत्त्वाचा वाटतो तिथे पेन्सिलने खूण करायची. मग त्यावरची टिप दुसऱ्या पानावर गिरवायची. अशा तऱ्हेने मग मी पुस्तकांवर लिहायला सज्ज झालो.

भाषेच्या बेगडीपणातून उमटलेल्या परीक्षणांची लाट फार पूर्वीपासून आली असल्याची आज अचानक (कपडे बडवताना) मला ‘उपरती’ झाली. पुढं त्याचं रूपांतर ‘इतस्तत:’ मध्ये झालं. मग मी (कपडे सोडून) कागद पेन हातात घेतला!

आजकालच्या भडंग नवकवींच्या किंबहुना कोणत्याच कवींच्या काव्यसंग्रहाचे ‘इतस्तत:’ लिहावे की लिहू नये यावर मी साशंक आहे. कारण मी कवितांवर लिहीलं की चिरफाड ठरलेलीच!





{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال